नागपूर विभागाचा बारावीचा निकाल ८९.५० टक्के
नागपूर विभाग : पाच वर्षांतील निकालाची टक्केवारी २०१० – ७४.१६,
२०११ – ६७.१३, २०१२  – ६८.९३, २०१३ – ७३. १०, २०१४ –  ८९.०७
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ८९. ५० टक्के लागला आहे. यावर्षी राज्यातील नऊही विभागीय मंडळाच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी राज्यात नागपूर विभागीय मंडळ सातव्या, तर अमरावती विभागीय मंडळ दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल १५.९७ टक्क्यांनी वाढला आहे. मुलांच्या तुलनेत मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
गेल्या वर्षी नागपूर विभागाच्या निकालाचे प्रमाण ७३.१० टक्के होते, हे लक्षात घेता यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी १५.९७ टक्क्यांनी वाढली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांंचा निकाल गेल्या वर्षी २८.३० टक्के व यंदा तो २५.४९ टक्के लागला आहे. म्हणजेच २.८१ टक्क्यांनी कमी लागला आहे. ९४.८५ टक्क्यांसह कोकण विभाग राज्यात आघाडीवर असून त्याखालोखाल अमरावती (९१.८५), कोल्हापूर (९१.५४), औरंगाबाद  (९०.९८), पुणे (९०.७३) लातूर (९०.६०), नागपूर (८९.०७) टक्के, नाशिक (८८.७१) आणि मुंबई (८८.३०) अशी निकालाची टक्केवारी आहे.
नागपूर विभागातून एकूण १ लाख ४२ हजार २३२ विद्यार्थ्यांनी बारावीसाठी नोंदणी केली होती. त्यातून १ लाख ४२ हजार ८४ विद्यार्थी परीक्षेला बसले व त्यापैकी १ लाख २६ हजार ५५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९८.०७ टक्के इतकी आहे. यात मुलींनी मुलांवर आघाडी घेतली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८६.३६ टक्के, तर मुलींचे प्रमाण ९१.६६ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी (रिपिटर) म्हणून या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी २५.४९ आहे.
नागपूर विभागात सर्वात जास्त निकाल गोंदिया जिल्ह्याचा लागला असून तेथील उत्तीर्णाची टक्केवारी ९१.५० टक्के आहे. त्याखालोखाल नागपूर (९०.७७), भंडारा (८८.२४), चंद्रपूर (८७.६६), वर्धा (८६.४८), गडचिरोली (८४.३८) अशी जिल्हानिहाय टक्केवारी असून गडचिरोली जिल्ह्य़ाचा निकाल सर्वात कमी, म्हणजे ८४.३८ टक्के आहे. नागपूर विभागात शाखानिहाय विचार करता सर्वात जास्त निकाल (९३.४७ टक्के) विज्ञान शाखेचा लागला आहे. या शाखेतील  ५३ हजार ७२० पैकी ५० हजार २१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून ६१ हजार ४३९ पैकी ५२ हजार २६५ म्हणजे ८५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. वाणिज्य शाखेतून १९ हजार १७१ पैकी १७ हजार १९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ८९.६९ टक्के आहे. एमसीव्हीसी शाखेतून ७ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी ६ हजार ८२० म्हणजे ८८.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने शिक्षण मंडळाने यंदा इंग्रजी भाषेसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका आखली होती. नागपूर विभागात यंदा तोतयेगिरीची ३, तर कॉपीची ३२६ प्रकरणे पकडण्यात आली. यापैकी ३२१ प्रकरणांचा निकाल देण्यात आला आहे.
शिक्षण मंडळातर्फे कनिष्ठ महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप गुरुवार, १० जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपासून गुणपत्रिका मिळू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर विहित नमुन्यात शुल्कासह २० जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे आवश्यक राहील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेची प्रत त्यासाठी चालणार नाही. ऑक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांंना ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरावयाची असल्यास त्याबाबतच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांंनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची
छायाप्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांंना छायाप्रत हवी असेल, असे विद्यार्थी २१ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज प्राप्त करू
शकतील.