पावसाळ्यामध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहील, असे दावे रेल्वे प्रशासनाने केले असले तरी प्रत्यक्षात त्या दृष्टीने विशेष कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
पावसाळ्यापूर्वी रेल्वे मार्गातील सिग्नल पॉइंट्समध्ये आधुनिकीकरण करण्याची योजना आखण्यात आली होती. डिजिटल अ‍ॅक्सल काऊंटर लावण्यात आल्याचे आणि त्यामध्ये पाणी जाणार नाही यासाठी विशेष योजना बनविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र हे काम केवळ ४० ते ४५ टक्के पूर्ण झाल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रुळांमधील डिजिटल एक्सल काऊंटर आणखी उंच करणे शक्य नसले तरी बाजूला असलेले काऊंटर उचलणे शक्य असूनही ते उचलण्यात आलेले नाहीत. ठाणे स्थानकाजवळ असलेली रूट रिले प्रणालीदेखील बदलण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तेथील यंत्रणाच पहिल्या पावसाळ्यात नादुरूस्त झाली होती. पहिल्याच पावसाच्या दणक्यामध्ये सिग्नल यंत्रणेचे पॉइंट्स नादुरुस्त होऊ लागले आहेत. मात्र याचे खापर रेल्वे प्रशासन प्रवाशांवर फोडत आहे. रेल्वे मार्गात सर्वाधिक कचरा टाकण्यात येत असून पावसाच्या पाण्याबरोबर या पॉइंट्समध्ये तो अडकतो आणि पॉइंट्स खराब होतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हे पॉइंट्स उंचीवर ठेवण्याचा विचार सुरू असला तरी ते तांत्रिकदृष्टय़ा जास्त उंचीवर ठेवणे शक्य नसल्याचे सिग्नल विभागाचे म्हणणे आहे.
रेल्वेच्या हद्दीत असणारे नाले हे पालिकेच्या पाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणेला जोडण्यात आले असून ते स्वतंत्र नाहीत. परिणामी शहरामध्ये असणारे नाले तुंबले तर त्याचा परिणाम रेल्वेतील नाल्यांवर होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र ही रड दरवर्षीचीच असते.
उपनगरी रेल्वे मार्ग काही ठिकाणी थोडे उंच करण्यात आले आहेत. मात्र एका मर्यादेबाहेर ते उंचावणे शक्य नसते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्काधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले. रेल्वे मार्ग उंच केला तरी ओव्हरहेड वायर अधिक उंच करता येत नाहीत, असे ते म्हणाले. रेल्वे मार्गावर अनेक पादचारी व रस्ता वाहतुकीचे पूल आहेत. ओव्हरहेड वायरमध्ये आता २५ हजार व्होल्टस्चा विद्युतप्रवाह जात असतो. या सगळ्यामुळे रेल्वे मार्ग फार वर उचलता येत नाही, असे मालेगावकर यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा