सर्वच समाजबांधवांमध्ये उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्रावणी पौर्णिमेच्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या तयारीला वेग आला असून बाजारात वेगवेगळय़ा प्रकारांतील आणि आकारांतील रंगीबेरंगी असंख्य राख्यांनी बाजारपेठ फुलली आहे. यामध्ये चिमुकल्यांना डोळय़ांसमोर ठेवून छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन, श्रीकृष्ण आदींसह विविध प्रकारांतील आणि आकारांतील राख्या बाजारात आणल्या आहेत.
श्रावणातील पौर्णिमा मंगळवार २० ऑगस्ट रोजी येत असून या दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून बहिणी भावाचे औक्षणही करतात. केवळ िहदू धर्मामध्येच नव्हेतर सर्वच धर्मीयांमध्ये मोठय़ा उत्साहात होणारा हा सण साजरा केला जात आहे. भावाच्या हातात आकर्षक, सुंदर आणि हटके अशी राखी बांधण्यासाठी व त्याच्या खरेदीसाठी बाजारात बहिणींनी गर्दी करण्यास सुरुवातही केली आहे. जिल्ह्यासह प्रत्येक शहरात ठिकठिकाणी विविध भागांत राखी विक्रीची दुकाने मोठय़ा प्रमाणावर थाटण्यात आली आहेत.
या वर्षी बाजारात आलेल्या राख्यांमध्ये लहान मुलांना आवडणाऱ्या राख्यांचा समावेश मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामध्ये छोटा भीम, डोरेमॉन, मायटी राजू, बालगणेश आदी आकारांतील सुंदर व आकर्षक राख्यांनी चिमुकल्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सध्या बाजारात एक रुपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या विविध आकारांतील आणि विविध प्रकारच्या अनेक राख्या उपलब्ध आहेत. याशिवाय काही सराफ व्यावसायिकांनीही या रक्षाबंधनाच्या सोहळय़ासाठी सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या राख्यांच्या खरेदीसाठीही गर्दी होत आहे.
नोकरी आणि व्यवसायानिमित्त परगावी असलेल्या आणि सासरहून माहेरी जाता येत नसल्याने गावाकडे असलेल्या आपल्या भावाला राखी पौर्णिमेच्या अगोदर राखी मिळावी यासाठी राख्यांची खरेदी करून त्या पाठविण्यासाठी पोस्ट आणि कुरिअर कंपनीच्या सेवेचाच आधार घेताना दिसून येत आहेत. पोस्टामध्ये आणि कुरिअर कंपन्यांमध्ये राख्या पाठविण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा