सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने व जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे, घर, शाळा, जनावरांचे छत यांचे पत्रे उडून पडणे यासारख्या प्रकाराने हैदोस घातला होता. तासगाव तालुक्यात केळी,द्राक्षे व झेंडूची शेती भुईसपाट झाली. तर, निपाणीजवळ झालेल्या अपघातात पिंपळाचे झाड मारूती व्हॅनवर कोसळून तिघे जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले.
दुष्काळी सांगली जिल्ह्य़ातील नागरिकांना पावसाच्या आगमनाची अपेक्षा होती. सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. बेधुंद कोसळलेल्या अवकाळी पावसाने तासगाव, मिरज, शिराळा, मांगलेपरिसरात मोठे नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील द्राक्षे शेती प्रसिध्द आहे. मात्र द्राक्ष शेतीबरोबर केळी व झेंडूचे पीक गारपिटीमुळे जमीनदोस्त झाले. कवठेएकंद येथील गोविंद तुकाराम पाटील यांच्यासह आठ शेतक ऱ्यांच्या द्राक्ष बागेतील उभे पीक वाया गेले. सचिन पंढरीनाथ सुर्वे यांच्या केळीच्या बागेची नासधूस होऊन सुमारे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले. मिरज या तालुक्याच्या ठिकाणी अर्धातास जोरदार पाऊस पडला. अनेक ठिकाणची झाडे पडण्याबरोबरच दुकानांचे फलक उडून जाण्याचे प्रकार घडले. वादळी वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा आठ तासाहून अधिक काळ खंडित होता. शिराळा येथे ग्रामपंचायतीसमोर असलेल्या मशिदीवर कोसळले. त्यामध्ये मशिदीचे किरकोळ नुकसान झाले. किल्ला परिसरातील अनेक झाडे जमीनदोस्त झाली. मांगले येथे पावसाने हाहाकार घातला. शाळा नं.१ व २ मधील पत्रे उडून गेले. रेशिम कार्यालयाची कौले मोठय़ा प्रमाणात फुटली. धनटेक वसाहतीतील जनावरांच्या शेडची छपरे वाऱ्याने उडून गेली. सुमारे२० ते २५ विजेचे खांब कोसळल्याने दीर्घकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दक्षिणेस व बेळगाव जिल्ह्य़ाच्या उत्तरेस पाऊस कोसळला. निपाणी जवळ असलेल्या शिप्पूर गावात वादळी वाऱ्यामुळे पिंपळाचे झाड मारूती व्हॅनवर कोसळले. त्यामध्ये फरजान मुस्ताक मुल्ला(वय ३५), मुलगी फरहा (वय १) व मुलगा महमंद (वय ४) हे जागीच ठार झाले. तर मुस्ताक मुल्ला यांच्यासह सहाजण जखमी झाले. जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. आजरा येथून कबनूरकडे मुल्ला कुटुंबिय मारूती व्हॅनमधून जात होते. शिप्पूर गावाजवळ व्हॅन आली असता जोरदार वादळी वाऱ्यामुळे पिंपळाचे झाड कोसळून अपघात झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा