नांदेड विभागांतर्गत पाच जिल्ह्य़ांत १४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, आतापर्यंत १ लाख ७६ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.नांदेड विभागांतर्गत यंदाच्या हंगामात ३१ कारखान्यांनी गाळप सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केले. पैकी रत्नप्रभा, योगेश्वरी, गंगाखडे, भाऊराव, पूर्णा, डॉ. आंबेडकर, विठ्ठलसाई, नॅचरल शुगर, भीमाशंकर, भैरवनाथ, शेतकरी (किल्लारी), रेणा व भाऊराव अंतर्गत येणाऱ्या अन्य दोन कारखान्यांनी गाळप सुरू केले. भाऊराव, पूर्णा व रत्नप्रभा या तीन साखर कारखान्यांचा साखर उतारा ९ पेक्षा अधिक असल्याने तेथील शेतकऱ्यांना जादा भाव मिळण्याचे चिन्ह आहे. आतापर्यंत १४ कारखान्यांनी २ लाख ८० हजार ७२५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ७६ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
यंदा पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. त्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावरही झाला. सरकारने १ हजार ७०० रुपये हमीभाव ९.५० टक्के उताऱ्यासाठी जाहीर केला असून त्या पुढच्या प्रत्येक १ टक्का उताऱ्याला १७० रुपये अधिक भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उसाची आवश्यक वाढ झालीच नाही. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होईल, अशी शक्यता आहे. गतवर्षी ३१ कारखान्यांनी १ लाख ८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. १ कोटी २६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र त्यात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge production of sugar from 14 factory