एरवी पन्नास पैसे ते एक रुपया दरम्यान सहज उपलब्ध होणा-या गुलाबाच्या फुलाला काल सकाळी दोन रुपये, दुपारी पाच रुपये तर रात्री थेट दहा रुपयांचा भाव मिळाला. एवढे पैसे देऊनही फुले उपलब्ध होत नव्हती. उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीनंतर आज सुरू झालेल्या शाळांमुळे फूल विक्रेत्यांची चांदी झाली!
राज्यात जवळपास आज सर्वत्र प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शिक्षण हक्क कायद्यानुसार आता एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यासाठी गेले दोन दिवस शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. काल (रविवार) सकाळी सात वाजताच सर्व शाळा उघडल्या होत्या. गावोगाव शिक्षक व पदाधिका-यांसह पदयात्रा व गृहभेटी देऊन पालकांना शाळा सुरू होत असल्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर आज शाळेच्या आजच्या पहिल्याच दिवशी सर्व नवीन विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
प्राथमिक शाळेत पहिलीत दाखल होणा-या व माध्यमिक शाळेत पाचवीत दाखल होणा-या तसेच कोणत्याही इयत्तेत नव्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत फुले देऊन करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे गुलाबाची फुले खरेदी करण्यासाठी शिक्षक व शिक्षिकांची झुंबड उडाली होती. ज्यांनी हुशारी दाखवत सकाळीच आगाऊ खरेदी केली त्यांना एक ते दोन रुपये दराने गुलाबाची फुले मिळाली. अचानक मागणी वाढल्याने फूल विक्रेत्यांनी पाच रुपयांपर्यंत प्रती फुलाचा भाव नेला. एव्हाना फूल विक्रेत्यांच्याही लक्षात ही बाब आली. संपत चाललेली फुले आणि वाढत चाललेली मागणी अशा स्थितीत रात्री हा दर थेट दहा रुपयांवर जाऊन पोहोचला. काही शिक्षकांनी तयार हार खरेदी केले व त्यातून गुलाबाची फुले काढून घेतली. फूल उत्पादकांच्या पदरी काही पडले नाही, मात्र विक्रेत्यांची चांगलीच चंगळ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा