मराठवाडय़ातल्या काही जिल्ह्य़ांमध्ये येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ७ सेंटीमीटपर्यंत पावसाची नोंद होईल, असे कळविण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान शनिवारी रात्री जिल्ह्य़ात सर्वदूर पाऊस झाला. कन्नड तालुक्यातील इटा येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला. आज सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी आहे. दुपारी आभाळात ढगांची दाटी झाली होती. सायंकाळी शहरात रिमझिम पाऊस होता.
जिल्ह्य़ात गेल्या चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कमी-अधिक प्रमाणात दिवसभरात एखादी तरी मोठी सर येते. रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात नोंदवला गेलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे: (सर्व आकडे मि.मी.मध्ये) औरंगाबाद १६.९०, फुलंब्री २४.७५, पैठण १२.१०, सिल्लोड १८.१०, सोयगाव १५, कन्नड ३३.५०, वैजापूर २१.४०, गंगापूर १२.४४, खुलताबाद १४.७०, एकूण १६८.८९. ९ जुलैपर्यंत पडलेला पाऊस सरासरीपेक्षा अधिक आहे. ३५०.६० मि.मी. पाऊस पडावा, असे अपेक्षित आहे. या वर्षी प्रत्यक्ष पडलेला पाऊस ४८२.४४ एवढा आहे.                                                                                     रविवारी मराठवाडय़ात सर्वत्र ढगाळ वातावरण
तीव्र दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पहिला पाऊस चांगला झाल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहेत. शनिवारी रात्री औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ात पावसाच्या सरी येत होत्या. रविवारच्या दिवसभरात आभाळात ढग दाटून आले. येत्या ४८ तासांत मोठा पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद येथे रविवारी दिवसभर पाऊस झाला नाही. मात्र सर्वत्र ढगाळ वातावरण होते.

Story img Loader