इचलकरंजी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या शिकाऊ वाहन परवाना शिबिराला नागरिकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी ७०० जणांना परवानापत्र देण्यात आले. तर शिबिरामध्ये ३ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले असून, त्यांना टप्प्याटप्प्याने परवानापत्र दिले जाणार आहे.
तरुणांकडून वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या उद्देशाने आमदार सुरेश हाळवणकर यांनी या कॅम्पचे आयोजन केले होते. प्रत्येक महाविद्यालयाच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच शहापूर येथील विश्रामगृहात तरुण, महिला व नागरिकांची एकच गर्दी झाली होती. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या चौकशी कक्षात अर्ज भरण्याची माहिती देऊन पडताळणी केली जात होती. अर्ज पूर्ण असलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यानंतर इचलकरंजी मोटारवाहन ट्रेनिंग स्कूल असोसिएशनच्या सहकार्याने अर्जाची छाननी केली जात होती. या प्रक्रियेनंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या निरीक्षकांकडून परवानापत्र देण्याची कार्यवाही केली गेली.
प्रत्येक आठवडय़ाला फक्त बुधवारी परवानापत्र वितरित केले जात होते. मंगळवारी विशेष बाब म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता शहरात स्वतंत्र परिवहन कार्यालयाची गरज अधोरेखित झाली. शिबिरस्थळी नगरसेवक अजित जाधव, महादेव गौड, मदन झोरे, राजू आलासे आदींनी भेट दिली.
—————-
फोटो – २५ इचल १, २
फोटोओळी
शिकाऊ वाहन परवानापत्र मिळविण्यासाठी शहापूर येथे तरुणांनी अशी गर्दी केली होती.(छाया-साईनाथ जाधव)

Story img Loader