घरगुती गणरायाला निरोप दिल्यानंतर तरूण मंडळांनी देखावे सादरीकरणावर भर दिला आहे. देखावे पाहण्यासाठी सहकुटुंबासह लोक रस्त्यांवर उतरल्याने रस्तोरस्ती गर्दीचा महापूर ओसंडतांना दिसत आहे. प्रबोधनपर आणि जिवंत देखावे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण आहे. मंडळांकडून देखाव्यांचे प्रमाण कमी होत चालले असून सुबक व आकर्षक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे कल वाढत चालला आहे.    
गणेशोत्सव ऐन भरात आला आहे. घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्याने मंडळी शहर व उपनगरातील गणरायाचे व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडली आहेत. सायंकाळनंतर प्रमुख रस्ते गर्दीने ओसंडून जात आहेत. आकर्षक, तांत्रिक व सजीव देखावे असलेल्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. गर्दी नियंत्रणात आणतांना स्वयंसेवक व पोलीस यंत्रणेची धावपळ उडालेली आहे.    प्रतिवर्षांप्रमाणे शाहूपुरीतील गणेश मंडळांनी गर्दी खेचण्यात यश मिळविले आहे. राधाकृष्ण तरूण मंडळाने बेंगलोर येथील विशालाक्षी मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाईची प्रतिमा पाहण्यासाठी मोठी रांग लागली आहे. व्यापारी पेठेतील शाहूपुरी युवक मंडळाने आंतरराष्ट्रीय संदभार्ंकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या घुसखोरीला भारतीय जवानांचे ठोस प्रत्युत्तर, हा देखावा लक्षवेधी ठरला आहे. पाताळनगरातील मंदिराची रचना चौथ्या गल्लीत केली असून तेथील झुलत्या पुलावरून जाताना चिमुकल्यांना गगनात मावेनासा असा आनंद होतो आहे.     
पंचवीस फुटी राक्षस, अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती, अंधश्रद्धेवर आधारित नरबळी, स्त्रीभ्रूण हत्या,सावधान इंडिया असे देखावे कसबा बावडामध्ये सादर करण्यात आले आहेत. जयभवानी तालीम मंडळ या शतकमहोत्सवी मंडळाने स्वराजासाठी शिवरायांनी घेतलेली शपथ देखाव्यातून सादर केली आहे. शहीद कुंडलिक माने यांचे बलिदान अधोरेखित करणारा मनोरंजन मंडळाचा देखावा गर्दी खेचत आहे. पाचगाव, कळंबा परिसरातही कांही चांगले देखावे सादर झाले आहेत. ‘ऑल इज वेल मास्तर झाला फेल’ या विनोदी नाटिकेत शिक्षकातील अपप्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘मिटव तंटा’ या देखाव्यातून तंटामुक्तीचे महत्त्व हिंदवी स्वराज्य मंडळाने लोकांसमोर आणले आहे.    सजीव देखावे हे कोल्हापूरच्या उत्सवाचे वेगळे वैशिष्टय़ आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज, डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सादर केलेले देखावे लोकांना आवडल्याची प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारा देखावा लेटेस्ट तरूण मंडळाने सादर केला आहे. शाहू महाराजांचे समाज प्रबोधनाचे कार्य आजही उपयुक्त असल्याचा संदेश यातून मिळतो आहे. शनिवारी पेठेतील संयुक्त मित्रमंडळाने अंधश्रध्देवर प्रहार करणारी नाटिका बसवून डॉ.दाभोलकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे. पद्मश्री गणेश तरूण मंडळाने ‘चेटकिणीचा उडाला फज्जा’ या देखाव्यातून अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला आहे. खासबाग जवळील प्रिन्स क्लबने ‘बाप्पा रुसले आणि पळून गेले’ हा देखावा सादर केला आहे. ‘मुंबईचा बादशाह एन्काउंटर’ हा देखावा सोमेश्वर मित्रमंडळाने सादर केला आहे. पाच बंगला मित्रमंडळाने गुटखा बंदीचा सजीव देखावा सादर करीत व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे.     
कोल्हापुरात देखाव्यांबरोबरच नयनमनोहरी रोषणाई करीत उत्सवी स्वरूपावर भर दिला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळांकडून बॅरिकेट्सची सोय केली आहे. पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र रांगा केल्याने देखावे पाहण्यात सुलभता आली आहे. अनेक मंडळांनी सीसी टीव्हीची सोय केली असल्याने अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. बहुतांश मंडळांनी पर्यावरण संरक्षण, स्त्रीभ्रूण हत्या, रंकाळा स्वच्छता, पंचगंगा नदी प्रदूषण, वृक्षारोपण आदी विषयांचे फलक लावून प्रबोधनाचा जागर घडविला आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा