पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास त्वरित लावावा या मागणीसाठी गुरुवारी  शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलिसांच्या निष्क्रियतेचाही या वेळी निषेध कण्यात आला.  
दरम्यान सहायक  पोलिस निरीक्षक  मारुती मुळूक यांनी आठ दिवसांत तपासाचे आश्वासन दिल्यामुळे पोलीस ठाण्यावर आयोजित करण्यात आलेला मोर्चा स्थगित करण्यात आला. त्याऐवजी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सहायक  पोलिस निरीक्षक मुळूक यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या तीव्र भावना मांडल्या. शिष्टमंडळात बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वसंत चेडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, चंद्रकांत चेडे, शैलेंद्र औटी, प्रमोद गोळे, कल्याण थोरात आदींचा समावेश होता.
नागेश्वर मंदिरातील पार्वतीच्या शाळुंकेवरील सुमारे एक लाख रुपयांच्या चांदीच्या आवरणाची चोरी होऊन आठ दिवस उलटले तरी चोरीचा तपास लागत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच मंगळवारी रात्री शहरात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चो-या झाल्यामुळे  ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. त्यामुळे पोलिसांचा निषेध करण्यासाठी पारनेर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी, सहकारी पतसंस्था, शाळा, महाविद्यालये उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले. बंद शंभर टक्के यशस्वी झाला.
बंदमुळे शहरात विविध कामांसाठी बाहेरून येणा-या नागरिकांची मात्र चांगलीच गैरसोय झाली. पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात नागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास त्वरित लावावा या मागणीबरोबरच पारनेर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाची नियुक्ती करावी. शहरात कायमस्वरूपी रात्रीची गस्त सुरू करावी. पारनेर पोलिस ठाण्यात मंजुरीनुसार पोलिस कर्मचा-यांची नियुक्ती करावी. पारनेर बसस्थानक व महाविद्यालय परिसरात कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
 घडी विस्कटली
पोलिस निरीक्षक सुनील शिवरकर यांच्या निष्क्रियतेमुळे गेल्या काही महिन्यांपासून पारनेर पोलिस ठाण्याची  घडी पूर्णपणे विस्कटली आहे. गुन्ह्य़ाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गुन्ह्याचा तपास मात्र लागत नाही. शिवरकर यांच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेले पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी मासिक बैठकीत शिवरकर यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेले शिवरकर दीर्घ मुदतीच्या रजेवर निघून गेले.