कोल्हापूर शहरातील टोल आकारणी विरोधात आयोजित केलेल्या शहर बंदला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टोलविरोधी कृती समितीने कावळा नाका येथे निदर्शने केली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. खासदार राजू शेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक केली. बंद शांततेत पार पडला.    
कोल्हापूर शहरामध्ये आयआरबी कंपनीच्या वतीने अंतर्गत रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. आयआरबी कंपनीने केलेले हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याविरोधात जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. शहरात बनविण्यात आलेल्या या रस्त्यांवर टोल आकारणी करण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचे वृत्त टोलविरोधी कृती समितीकडे पोहोचले. त्यावर शासनाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत टोल आकारणीस टोला देण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार बुधवारी कोल्हापूर शहर बंदची हाक देण्याबरोबरच चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गेला होता.     
बुधवारी सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार ठप्प होते. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड आदी व्यापारी भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून आंदोलनाला सहकार्य केले. तथापि राज्य परिवहन, केएमटी, रिक्षा यांची वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती.    
टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी बिंदू चौकात जमले होते. शहिदांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. कोणत्याही परिस्थितीत टोल देणार नाही,  आयआरबी हटाओ, टोल आकारणीचा निर्णय घेणाऱ्या शासनाचा निषेध असो अशा घोषणा दिल्या जात होत्या. मुख्य मार्गाने फिरून मोर्चा ताराराणी पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी सुरू करून निदर्शने सुरू केली. घोषणाबाजी देत आंदोलन सुरू राहिल्यामुळे चारही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली.     सुमारे अध्र्या तासानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र त्यास आंदोलकांनी नकार दिला. त्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. खासदार शेट्टी, आमदार क्षीरसागर, आमदार नरके, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, धनंजय महाडिक, कॉ. दिलीप पवार, बाबा इंदूलकर, महेश जाधव, बाबा पार्टे यांच्या सहकार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. दिवसभर बंदचे असलेले वातावरण सायंकाळी पूर्ववत झाले.