लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना जिल्ह्य़ाच्या मुख्यालयी शिवसेनेत खासदार प्रतापराव जाधव गट विरुद्ध आमदार विजयराज शिंदे गट अशा पक्षातंर्गत बंडाळी व संघर्षांने पेट घेतला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने आमदार शिंदे यांच्या विरोधात जबरदस्त आघाडी उभारल्याने हा संघर्ष शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर परिषदेत शिवसेनेच्या कुबडय़ांवर कॉंग्रेसची सत्ता आहे. शिवसेना आमदार विजयराज शिंदे यांचा नगरसेवकांचा गट व कॉंग्रेसचे नगरसेवक, अशी राजकीय अभद्र युती नगरपरिषदेत असून त्या आधारावर कॉंग्रेसच्या उज्वलाताई काळवाघे नगराध्यक्ष झाल्या.
बुलढाणा शहरात निर्माण झालेल्या नागरी समस्या व विकासाची दुरावस्था हे मुद्दे घेऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या गटाचे जिल्हा प्रमुख धीरज लिंगाडे, शहरप्रमुख मुन्ना बेंडवाल, पदाधिकारी धनंजय बारोटे, सुनील भाग्यवंत यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी अभद्र युतीच्या विरोधात भव्य डफडे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शिवसैनिकांसह भाजपाच्या शहर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. या मोर्चात शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल, पदाधिकारी सुनील भाग्यवंत यांनी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर जहाल टीका करून नगरपरिषदेतील भ्रष्टाचारासाठीच त्यांनी पक्ष कॉंग्रेसच्या दावणीला बांधल्याचा आरोप केला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच आमदार विजयराज शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी व संघर्ष उफाळून आल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व बुलढाण्याचे आमदार विजयराज शिंदे यांच्यात पक्षातील वर्चस्वासाठी नेहमीच संघर्ष सुरू असतो.
खासदार जाधव यांनी शिंदेंचे कट्टर विरोधक असलेले धीरज लिंगाडे यांना जिल्हाप्रमुख पदावर विराजमान केल्यानंतर हा संघर्ष तीव्र प्रमाणावर झाला आहे. दोघेही आगामी आमदारकीच्या तिकीटाचे दावेदार असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमदार शिंदेंच्या विरोधात जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी एक जबरदस्त गट निर्माण केला असून हा गट सातत्याने शिंदेंना लक्ष्य करीत आहेत. अलीकडच्या डफडे मोर्चाने हा संघर्ष अधिक पेटला असून त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा