कोंडी का होते पोलिसांनाच कळेना..!
कार्यालयाच्या वेळेपेक्षा तेथे जाण्याकरता प्रवासाला अधिक वेळ लागत असल्याची हतबलता गेले काही दिवस मुंबईकर नोकरदार अनुभवत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सायन-धारावी जंक्शन, ठाणे- कापूरवाडी जंक्शन, कल्याण शिळफाटा मार्ग ही वाहतूक कोंडीची जणू केंद्रेच झाली आहेत. तसेच पूर्व मुक्त मार्ग सुरू होऊनही जे. जे. रुग्णालय ते सीएसटी स्थानक या एरवी ५-१० मिनिटांच्या प्रवासालाही सध्या तब्बल तासभर लागत आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे होत आहे, असा प्रश्न खुद्द वाहतूक पोलिसांनाच पडला आहे. खड्डय़ात गेलेले रस्ते, ठिकठिकाणी सुरू असलेली उड्डाणपुलांची बांधकामे, पावसाचे साचलेले पाणी, रस्त्याची दुर्दशा ही वाहतूक कोंडी होण्याची तसेच त्यात भर घालण्याची काही प्रमुख कारणे आहेत. परंतु यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचताना आणि परतीचा प्रवास करताना नाकी नऊ येत आहेत. ट्रॅफिकमध्ये वरचेवर अडकून पडल्याने वाढलेला प्रवासाचा वेळ, चुकलेली पैशाची गणिते आणि त्यामुळे होणारा शारीरिक – मानसिक त्रास यामुळे नोकरदार मुंबईकर घायकुतीला आले आहेत. रेल्वे स्थानकांपासून दूर असलेली कार्यालये वा एकाहून अधिक रेल्वे गाडय़ा बदलण्याची आवश्यकता भासत असल्यास कित्येक नोकरदार महामार्ग वाहतुकीवर अवलंबून असतात. मुंबईहून ठाणे, नवी मुंबईला तसेच चेंबूर येथे महामार्गाने ये-जा करणाऱ्यांच्या संख्येतही गेल्या तीन वर्षांत कमालीची वाढ झाली आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नोकरदाराची भिस्त बेस्ट, एसटी, रिक्षा, टॅक्सी, कूल कॅब वा खासगी वाहनांवर असते. मात्र, गेले काही दिवस कोसळणारी संततधार आणि रस्त्यांची दुर्दशा यामुळे महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच रस्त्यात बेशिस्तपणे केलेले पार्किंग वा वाहतूक नियम धाब्यावर बसवत आपली गाडी पुढे दामटण्याचा केलेला प्रयास यामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढते. वाहतूक कोंडी नियंत्रणापलीकडे जात असल्यामुळे त्याकडे हतबलतेने पाहण्यावाचून वाहतूक पोलिसांनाही फारसे काही करता येत नाही.
बोरिवली – वाशी रस्ते प्रवासाला सकाळी दोन-अडीच तास तर संध्याकाळी किमान तीन तासांचा अवधी लागतो. तर पश्चिम उपनगरांतून द्रुतगती मार्गाने दक्षिण मुंबईत पोहोचायला तसेच परतीच्या प्रवासालाही साडेतीन-चार तासांहून अधिक वेळ लागत आहे. कार्यालयामध्ये सहा-आठ तासांचे काम करण्यासाठी सहा तासांचा अंग मोडून काढणारा प्रवास करावा लागत आहे. यामुळे त्यांचे केवळ कार्यालयीनच नव्हे तर घरचेही वेळापत्रक कोलमडून पडत आहे. पाळणाघरातील मुले, त्यांचा अभ्यास, रात्रीचा स्वयंपाक, जेवणाच्या वेळा या साऱ्या दिनक्रमात प्रचंड ताण आणि अनियमितता आल्याचे साऱ्यांनाच जाणवू लागले आहे. आरोग्यावर होणारे हे ‘स्लो पॉयझनिंग’ असल्याचेही अनेकांच्या लक्षात येत आहे. परंतु त्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नाही.
रोगांना आमंत्रण
बहुतेक सर्व उपनगरांपासून जवळपास ५ कि.मी.च्या पट्टय़ात प्रचंड वस्ती आहे. या परिसरात राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना स्थानकांवर पोहोचण्यासाठी बेस्ट बसेस अथवा रिक्षांशिवाय पर्यायच नाही. पैसे वाचविण्यासाठी बेस्टने जावे तर रिक्षापेक्षा तिला पोहोचायला बराच जास्त वेळ लागतो. रिक्षाने जावे तर वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मिनिटामिनिटाला इलेक्ट्रॉनिक मीटरवरील रुपयांचा आकडा पुढेपुढे सरकत जातो. कालच्या अनुभवावरून घरातून आज आणखी थोडा वेळ लवकर निघावे तर आज पुन्हा गणित चुकतेच. पुन्हा सकाळचा मनस्ताप सायंकाळी दुप्पट आवेगाने पुन्हा अंगावर येतो. होऊ घातलेला उशीर, रिक्षाचे धावणारे मीटर, आपण काहीच करू शकत नाही ही अगतिकता याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. रक्तदाब, हायपरटेन्शन, चिडचिडेपण आदी रोगांना ही परिस्थिती आमंत्रणच देत आहे.
वाहतूक कोंडीमुळे बेस्ट बसना लागणारा वेळ
(कंसात नेहमी लागणारा वेळ)
’ बोरिवली – ठाणे – दीड ते दोन तास (१ तास)
’ ठाणे – वाशी – एक ते सव्वा तास (४५ मिनिटे)
’ बोरिवली – जोगेश्वरी लिंक रोड – एक ते सव्वा तास (२५ मिनिटे)
’ जोगेश्वरी-लिंक रोड – सीप्झ – एक तास (२० मिनिटे)
’ बोरिवली – वांद्रे खेरवाडी जंक्शन – दीड ते पावणे दोन तास (४० मिनिटे)
’ बोरिवली ते महापे – तीन तास (सव्वा ते दीड तास)
’ बोरिवली ते वाशी – साडे तीन तास (दीड तास)
’ सायन ते चेंबूर – दीड तास (२५ मिनिटे)
’ धारावी ते लालबाग – दीड ते पावणेदोन तास (३५ मिनिटे)
’ अंधेरी पूर्व ते साकीनाका – दीड तास (४५ मिनिटे)
’ चार बंगला ते अंधेरी – एक तास (२५ मिनिटे)
वाहतूक कोंडी होत आहे हे मान्य आहे. रस्त्यातील खड्डे आणि बंद पडलेली वाहने ही कारणे आहेतच. परंतु काही वेळा अचानक कोंडी का होते हे कळेनासे झाले आहे. आमचे वाहतूक पोलीस नियमन करून ती सोडवत आहेत
प्रताप दिघावकर, उपायुक्त (वाहतूक)