अखिल भारतीय नौजवान सभेच्या युवती विभागातर्फे महिलांवरील अत्याचाराचा ‘मानवी साखळी’ द्वारे सुमारे पाचशे युवक-युवतींनी निषेध केला. शिवाजी विद्यापीठातील या आंदोलनात सहभागी युवक आणि युवतींनी स्त्री-पुरुष समानतेची शपथ घेतली. 
पाकिस्तानमधील मलाला युसूफसाई या १४ वर्षीय मुलीवर गोळी झाडून तिच्या हत्येचा प्रयत्न झाला. धार्मिकतेच्या नावाखाली मुलींना शिक्षणबंदी, खाप पंचायती व धार्मिक संस्था यांच्या विविध फतव्यांद्वारे सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या या फतव्यांना आव्हान देण्यासह त्यांचा निषेध करण्यासाठी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांवरील अत्याचाराविरोधातील घोषणांचे फलक घेऊन या मानवी साखळीमध्ये युवती उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. मुख्य इमारतीपासून भूगोल विभागापर्यंत ही मानवी साखळी तयार झाली. त्यानंतर सर्वजण ग्रंथालयासमोर एकत्रित जमले. या ठिकाणी ‘आम्ही स्त्रीवर अन्याय करणार नाही, अन्याय होताना तो मूकपणे पाहणार नाही. तसेच अन्याय सहनही करणार नाही तर, त्या विरोधात संघर्ष करू,’ अशी प्रतिज्ञा युवक-युवतींनी केली. सुनेत्रा ढेरे हिने या प्रतीचे वाचन केले. यावेळी वृषाली बर्गे हिने महिलांनी सोशिकता बाजूला ठेवून अन्यायाविरोधात प्रतिकार करावा, असे आवाहन केले.
या आंदोलनात दीपिका क्षीरसागर, प्राची िशदे, अर्चना माने, नीशा पाटील, विद्या कांबळे, चांदणी कांबळे, प्रशांत आंबी, अमोल देवडकर, गिरीष फोंडे, योगेश फोंडे, अविनाश कांबळे, प्रशांत पिसे, अनिल बावकर, विजय जानकर, अक्षय रूपनवर, महारुद्र वाघोळकर, अभिजित देवकुळे यांच्यासह विद्यापीठातील युवक-युवतींनी सहभाग घेतला.

Story img Loader