मनुष्यप्राणी स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाचा ऱ्हास करत असून पर्यावरण वाचवायचे असेल तर आपल्या वृत्तीत बदल केला पाहिजे, असे आवाहन व्यसनमुक्त संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. स्वच्छता निर्मूलनासाठी स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींची तसेच अधिकाऱ्यांची गरज आहे, असे मतही व्यक्त केले.
आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र व घाटाच्या स्वच्छतेसाठी स्थापन केलेल्या इंद्रायणी सेवा संघाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल वीर, अण्णा जाधव, डॉ. नारायण महाराज, हनुमंत लांडगे, डॉ. सुभाष देठे, डॉ. विश्वास येवले, डॉ. अनिल काळे, डॉ. संजय देवकाते आदी उपस्थित होते.
कराडकर म्हणाले, डाऊ केमिकल्स कंपनी हटवण्यासाठी वारकऱ्यांनी लढा उभारला. मात्र, समाज जागृतीसाठी तो लढा पुढे टिकवून ठेवायला हवा होता. आळंदीतील कचऱ्याचा प्रश्न व दूषित पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो सुटण्याची गरज आहे. जलप्रदूषणाच्या निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी धूम्रपान व गुटखाबंदीचाही प्रचार करावा, असे ते म्हणाले. विठ्ठल वीर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल वाळुंज यांनी आभार मानले.