शहरातील पाणीपुरवठय़ाची समस्या कायम असून ऐन उन्हाळ्यात काही भागास अपुऱ्या पाणी पुरवठय़ाला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी मिलिंदनगर येथील महिलांनी पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला. दहा दिवसात सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शहरातील पाणी पुरवठय़ाची स्थिती सर्वश्रृत आहे. सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा दरात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पालिका सुरळीत पाणी पुरवठा करत नसताना वा गळती रोखत नसताना दरात वाढ करण्याच्या मुद्यावरून आधीच विरोध करण्यात येत आहे. या विषयावर सभागृहात चर्चा होणार असताना पाणी पुरवठय़ातील त्रुटी मोर्चाने दर्शवून दिल्या. या संदर्भात मिलिंदनगर मधील नागरिकांनी वारंवार पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. पाणी प्रश्न त्वरीत सोडवण्याची मागणी केली. मिलिंदनगर परिसरात २० ते २५ वर्षे जुनी पिण्याच्या पाण्याची वाहिनी आहे. त्यात गाळ साचल्याने पाणी कमी दाबाने येते. त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. उलटपक्षी, प्रभाग क्रमांक २४ मधील कालीकानगर वसाहतीत २४ तास नियमीत पाणी पुरवठा होतो. परंतु मिलिंदनगर येथे पाणी येत नाही हा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
मिलिंदनगर परिसरात नियमीत पाणी पुरवठा करण्यासाठी परिसरात आठ इंच व्यासाची जल वाहिनी टाकावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पथदीप नसल्याने परिसरात भुरटय़ा चोरांसह रोडरोमियोंचे फावले आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे पथदीपांची व्यवस्था तातडीने करावी, स्वच्छता मोहीम राबवावी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आंदोलनात मिलिंद सावंत, सुनील दहिजे, बाबू गायकवाड, रवी रामराजे सुनिल मोरे आदी सहभागी झाले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2015 रोजी प्रकाशित
अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ हंडा मोर्चा
शहरातील पाणीपुरवठय़ाची समस्या कायम असून ऐन उन्हाळ्यात काही भागास अपुऱ्या पाणी पुरवठय़ाला सामोरे जावे लागत
First published on: 07-04-2015 at 07:02 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hunda agitation