तालुक्यात जामगाव येथे मंगळवारी सायंकाळी वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले. आमदार विजय औटी यांनी बुधवारी महसूल तसेच कृषी खात्याच्या पथकासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी खात्यामार्फत संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पारनेर शहर तसेच तालुक्याच्या इतर भागांतही बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या हजारो कांदा गोण्या अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भिजल्या.
दोन वर्षे दुष्काळाशी मुकाबला केल्यानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने जामगाव भागात ज्वारीचे पीक जोमात होते. गेल्या काही दिवसांत पावसाचे वातावरण तयार झाले होते. अवकाळी पाऊस होऊन पोट-यांमध्ये आलेल्या ज्वारीची भरणी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीस शेतकरी सुखावला, परंतु वादळी वाऱ्याने विरजण टाकले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शेतातील ज्वारीचे उभे पीक पाहता पाहता जमीनदोस्त झाले. हे पीक पोटऱ्यात आले आहे. अनेक ठिकाणी कणसेही आलेली आहेत. त्यामुळे जमीनदोस्त झालेली ज्वारीची ताटं पुन्हा उभी राहण्याची सुतरामही शक्यता नाही. त्याचा आता चाराच करावा लागेल.
या नुकसानीची आमदार विजय औटी यांनी बुधवारी भेट देऊन माहिती घेतली. दुपारी चारच्या सुमारास तहसीलदार जयसिंग वळवी, मंडल कृषी अधिकारी एस. ए. कांबळे कृषी पर्यवेक्षक गुंजाळ व सालके, पंकज जगदाळे, एकनाथ कुलट, मंडलाधिकारी बी. जी. भांगरे, तलाठी एस. आर. कर्डिले यांच्यासमवेत जामगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. हिवाळी अधिवेशनापूर्वी पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. औटी यांच्यासमवेत सुनील काळे, बाजीराव बांगर, आनंदा चौधरी आदी होते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पारनेर शहर व परिसरात तसेच तालुक्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी झालेल्या पावसादरम्यान वारा नसल्याने नुकसान झाले नाही, परंतु बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या हजारो कांदा गोण्या या पावसामुळे भिजल्या. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा