अभियांत्रिकीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ, रिव्हॅल्युएशनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांंची आर्थिक लूट आणि बीएससी प्रथम वर्षांचा निकाल तातडीने लावण्यात यावा, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांना शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेराव घातला. विद्यार्थ्यांचा रोष बघता यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले.  चंद्रपूर-गडचिरोली या दोन आदिवासी व अतिमागास जिल्ह्य़ांसाठी राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली आहे, परंतु या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचा विचार न करता सर्व विद्या शाखांना भरमसाठ शुल्क आकारले आहे. बी.ए. बी.कॉम. एम.कॉम., बी.बी.ए., बी.सी.ए. या शाखेचे महाविद्यालयीन व परीक्षा शुल्क हजारोंच्या घरात आहे. बी.एससी., एम.एससी., अभियांत्रिकी व एम.बी.ए. या शाखांचे परीक्षा शुल्क तर राज्यात सर्वाधिक गोंडवाना विद्यापीठाचे आहे, हे विशेष. त्यामुळे एखाद्या गरीब विद्यार्थ्यांला अभियांत्रिकी किंवा एम.बी.ए. करायचे तर दरवर्षी लाखो रुपये मोजावे लागतात. परीक्षा शुल्कामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीची तीव्र भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्यावतीने आज सकाळी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांना त्यांच्या निवासस्थानी घेराव घालण्यात आला.  केवळ अभियांत्रिकीच्या परीक्षा शुल्कातील वाढच नाही, तर रिव्हॅल्युएशनसाठी प्रती पेपर ५०० रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालविली आहे. यासोबतच विद्यापीठाने यंदा निकाल जाहीर करतांना मोठा घोळ केला आहे. बहुतांश विद्याशाखांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाही. बहुतांश शाखांच्या दुसऱ्या सेमिस्टरची पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून हा सर्व गोंधळ कुलकुरूंनी तातडीने दूर करावा, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

Story img Loader