डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर फलाट क्रमांक एकच्या प्रवेशद्वारावर काही उद्दाम रिक्षाचालक वाहनतळ सोडून रिक्षा उभ्या करतात. सकाळपासून ते रात्रभर हे रिक्षाचालक रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार अडवून उभे असल्याने नागरिकांना या भागातून चालता येत नाही. नागरिकांनी याविषयी आवाज उठवला की, रिक्षाचालकांकडून गटाने उद्दामगिरी केली जाते. अनेक नागरिकांनी याविषयी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांच्या निष्क्रिय कारवाईचा निषेध म्हणून उपोषण केले.
विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोर आणि फलाट क्रमांक एकच्या बाहेर रिक्षाचालकांचा रस्ते, प्रवेशद्वार अडवून उभे राहण्याचा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. फलाट क्रमांक एकजवळील प्रसाधनगृहाजवळ काही रिक्षाचालक रस्ते अडवून उभे असतात. याच ठिकाणी फेरीवाले बसलेले असतात. या प्रसाधनगृहाजवळून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वाहनतळ सोडून रिक्षा प्रवासी वाहतूक करणारे बहुतांशी रिक्षाचालक हे स्थानिक भूमिपुत्र आहेत, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. रस्ते, प्रवेशद्वार अडवून बसणाऱ्या या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला रिक्षा वाहनतळाजवळ एक दिवसाचे उपोषण केले. जोपर्यंत वाहनतळ सोडून अनधिकृतपणे रिक्षा प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत उपोषण टप्प्याटप्प्याने सुरूच राहील, असा इशारा वाहतूक पोलिसांना देण्यात आला आहे. आपने दणका देताच वाहतूक पोलिसांनी विष्णुनगर भागातील रेल्वे स्थानकाबाहेर प्रवेशद्वार अडवून उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांना तेथे उभे राहण्यास मज्जाव करण्यास सुरुवात केली आहे. मुजोरी करणाऱ्या चालकाला वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठावण्यात येत आहे.
फळविक्रेत्यांची दादागिरी
डोंबिवली रेल्वे स्थानकात पश्चिम भागात पुन्हा फळविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. रेल्वे स्टेशन मास्तरच्या समोर, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांच्या या फळविक्रेत्यांसमोरून सतत येरझाऱ्या चालू असतात, पण त्यांना हटवण्याचे धाडस एकही रेल्वे अधिकारी करीत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यांचे लक्ष्मीपूजन केले जात असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. यापूर्वी भाजपच्या नगरसेविका मनीषा धात्रक यांनी या फळविक्रेत्यांविरुद्ध उपोषण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पंधरा दिवस हे फळविक्रेते गायब झाले होते. पुन्हा त्यांनी प्रवेशद्वार अडवून व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.