शहरातील नंदनवन कॉलनीत ईदगाह ते डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयापर्यंतचा रस्तारुंदीकरणाचा आराखडा ४५ वर्षांपूर्वी मंजूर होऊनही त्याचे काम केले जात नाही. ही मागणी तातडीने मान्य करावी, यासाठी नगरसेवक मिलिंद दाभाडे व अ‍ॅड. धनंजय बोरडे महापालिकेसमोर गुरुवारी उपोषणास बसले. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी रक्कम महापालिकेने भरली आहे. भूसंपादन कार्यालयाकडून रस्ता बनविण्यासाठी आवश्यक ती मंजुरी न दिल्याने एवढे दिवस रस्ता होऊ शकला नव्हता, असा खुलासा महापालिकेने केला आहे.
नंदनवन कॉलनी ते डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयादरम्यान वेगवेगळ्या वसाहती विकसित झाल्या आहेत. या भागात ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. शहराला जोडणारा रस्ता अपुरा पडत असून १५ मीटर रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने सुरू करावेत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली. सकाळी व दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

Story img Loader