मुस्लिम बोर्डिगमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, एका गटाने मुस्लिम बोर्डिगच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. बोर्डिगचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनीही डोळेझाक केल्याचा आरोप या गटाने केला आहे. मुस्लिम बोर्डिगचे माजी संचालक महंमद रफीक शेख, हिदायत मणेर, सलीम बागवान आदींनी मुस्लिम बोर्डिगमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराचा पर्दाफाश शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
शेख म्हणाले, मुस्लिम बोर्डिगमधील संचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रतिवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची आवश्यकता असतानाही गेली सहा वर्षे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली आहे. संचालकांना समाजाच्या प्रश्नाची दखल घेण्याऐवजी राजकीय बाबीतच अधिक रस आहे. सभासदांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस बोर्डिगचे अध्यक्ष छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडे धाव घेतली, पण त्यांनीही तक्रारीकडे डोळेझाकच केली आहे. या सर्व घटनांमुळे संचालक मंडळाच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुस्लिम बोर्डिगच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात. पण खर्चाच्या नोंदी मात्र ठेवल्या जात नाहीत. संचालक मंडळ निष्क्रिय असल्यानेच नेहरू हायस्कूलचे दहावीचे केंद्रही काढून टाकण्यात आले.
प्राथमिक विभाग बंद आहे. मशिदीतील इमाम व अन्य कर्मचाऱ्यांना गेली दोन वर्षे पगार दिलेला नाही. राजर्षी शाहूमहाराज यांनी मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी मुस्लिम बोर्डिगची स्थापना केली. तथापि संचालक मंडळ मात्र राजर्षी शाहूंच्या उदात्त भूमिकेशी विसंगत वर्तन करत आहे. त्यामुळे संचालक मंडळाची व संस्थेच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी २४ फेब्रुवारीपासून मुस्लिम बोर्डिगच्या दारात बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

Story img Loader