गेली अनेक वर्षे रखडलेली नोकरभरती, सल्लागारांवर होणारी अनावश्यक उधळपट्टी, चौकशीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा होणारा मानसिक छळ आणि कर्मचाऱ्यांच्या सेवासुविधा यांसारख्या विषयांवर सिडको प्रशासन लक्ष देत नसल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सिडको कर्मचारी संघटनेच्या वतीने २९ जुलै रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
सिडकोची गेल्या ४५ वर्षांतील नोकरभरती कमी होत गेली आहे. अनेक कर्मचारी अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. सिडकोत १२०० कर्मचाऱ्यांची कमकरता आहे ती भरून काढावी, अशी सिडको एम्प्लॉइज युनियनची मागणी आहे. सिडकोने खारघर, पनवेल, द्रोणागिरी परिसरात अनेक छोटेमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी अनेक सल्लागारांची नेमणूक केली आहे. या सल्लागारांना वाहन, चालक, मानधन अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्यावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. असे २२ पेक्षा जास्त सल्लागार सिडकोत कार्यरत आहेत. त्यांच्यावर सिडकोचे कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे हा खर्च अनावश्यक आहे. जनसंपर्क विभागात अशा प्रकारे सल्लागार एजन्सी नेमण्यात आली असून कमी कर्मचारी भरल्यानंतर ह्य़ा सल्लागारांना घरी पाठविले जाईल, हे प्रशासनाने दिलेले उत्तर पाळलेले नाही. त्यामुळे सिडको आउटसोर्सिग करून कामे करीत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे दक्षता विभागाकडून काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून त्यांचा मानसिक छळ केला जात आहे असा आरोप कामगार संघटनेने केलेला आहे. त्यासाठी जूनी प्रकरणे उकरून काढली जात असून निवृत्तीच्या दिवशी चौकशीचा फेरा लावला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यात एक अस्वस्थता पसरली आहे. त्याचा कामावर परिणाम होत आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे कामाचे तास वाढत असताना कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे दबाब कायम ठेवणे योग्य नसल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे.
अपुरा कर्मचारीवर्ग असताना द्रोणागिरी येथील अग्निशमन दल सुरू करण्यात आला असून या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असून त्यांना समान काम समान वेतन दिले जात नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या २७ मागण्या तसेच अभियंता विभागाच्या सहा मागण्यांचा संघटनेने अनेक वेळा पाठपुरावा प्रशासनाकडे केला आहे, तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण कर्मचारी करणार असल्याचे अध्यक्ष नीलेश तांडेल यांनी सांगितले. संघटनेला नाइलाजास्तव हे हत्यार उपसावे लागत असल्याचे सचिव जे. टी पाटील यांनी स्पष्ट केले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडकोचा कारभार रुळावर आणला असून भ्रष्टाचारमुक्त सिडको करण्याचा विडा उचलला आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे ते दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सिडको कामगार संघटनेच्या वतीने २९ जुलै रोजी हे उपोषण केले जाणार आहेत.

Story img Loader