सध्या नागझिरा अभयारण्यातील मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या अधिवासांची प्रगणना सुरू आहे. यानंतरचा टप्पा हा व्याघ्रगणनेचा असेल. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या कॅमेऱ्यांवर शिकाऱ्यांच्या टोळींनी निशाणा साधल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षभरात नागझिरा अभयारण्याच्या विविध उपवनांतून सात कॅमेऱ्यांची चोरी झाली आहे. त्यातील सर्वाधिक घटना तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. स्थानिक बिटरक्षक व वनक्षेत्राधिकारी पोलिसात तक्रार नोंदवली आहे, पण प्रकरणाविषयी काय झाले, याचे साधे पत्रही अभयारण्य प्रशासनाला आजतागायत प्राप्त झाले नाही.
नागझिरा अभयारण्यात दरवर्षी वाघांच्या गणनेसाठी मिल्कॉन व चायना कंपनीचे कॅमेरे बसवण्यात येतात. फेब्रुवारीपासून ही गणना सुरू होते. साधारणपणे महिनाभराचा कालावधी लागतो. स्वयंचलित कॅमेऱ्यांमधून वाघांच्या निश्चित हालचाली, त्यांचा स्वभाव, रंग यात कैद होतो. दरवर्षीच्या तुलनेत नागझिराच्या सीमावर्ती भागातील वनक्षेत्रातून या कॅमेऱ्यांची सर्वाधिक चोरी झाली. शिकारी टोळींचे कृत्य असल्याचे सांगण्यात येते, परंतु वनविभाग यावर निश्चित भाष्य करायला तयार नाही. त्यांच्या कामाची पद्धतही अत्याधुनिक झाली. म्हणूनच या उपकरणांवर त्यांनी डल्ला मारला असावा, असा अंदाज काही व्याघ्र अभ्यासकांचा आहे. ९६ कॅमेरे मागील गणनेत बसवण्यात आले. त्यातील सात कॅमेरे बेपत्ता आहेत. तिरोडा कक्ष क्रमांक १४९, ७४, ९६, ९७ मंगेझरीतील कक्ष क्रमांक १२०, बुचाटोला कक्ष क्रमांक ११४ मध्ये तर डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या कक्ष क्रमांक ९६, ९७ मध्येही असाच प्रकार झाला. अनेक ठिकाणी काही संशयास्पद साहित्य मिळाले. यातील सहा घटना तिरोडा पोलीस ठाण्याच्या आहे, तर एकाचा तपास डुग्गीपार पोलिसांच्या कक्षेत येतो.
जवळपास दीड लाखाचे हे कॅमेरे असावे, असा अंदाज वन्यजीव विभागाचा आहे. पोलिसांनी हे प्रकरण वनविभागाचे आहे म्हणून केवळ नोंद करून घेतली. मात्र, चोरटे कोण, कुठले याचा साधा पाठपुरावाही झाला नाही. सर्वसामान्यांनी ते का म्हणून चोरावे, बाजारपेठेत या कॅमेऱ्यांना मागणी नाही. त्यामुळे थेट संशय शिकाऱ्यांच्या टोळीवर व्यक्त करण्यात येत आहे. वाघांची अचूक माहिती, जंगल प्रवेशाच्या दृष्टीने या कॅमेऱ्यांची चोरी झाल्याचा संशय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा