गडचिरोली जिल्ह्य़ातील कुरखेडा तालुक्यात कराडीच्या जंगलात रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेलेल्या आदिवासींवर नक्षलवादी समजून गोळीबार केला असता यात आनंद रावजी गावडे (४०) याचा मृत्यू झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेने चिन्ना मट्टामी प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे.
कुरखेडा तालुक्यातील कराडी-वैरागड मार्गावर काल मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास सी-६० पथकाचे जवान गस्त करत होते. नक्षलवाद्यांचा बंद असल्याने परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच दरम्यान कराडी गावाजवळ हिरो होंडा मोटरसायकल (एम.एच.३३-बी-४९३८) या गाडीने तीन अज्ञात इसम भरमार बंदूक, चाकू, सुरे व कुऱ्हाडी हा शस्त्रसाठा घेऊन कराडी येथून वैरागडच्या दिशेने भरधाव जातांना या पथकाला दिसले.  त्यांचा पाठलाग केला असता रस्त्यावर गाडी उभी ठेवून ते जंगलात पसार झाले. यानंतर जंगलातून त्यांनी जवानांवर भरमार बंदुकीतून गोळीबार केला.   नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याचे गृहीत धरून पथकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता यात आनंद रावजी गावडे हा गंभीर जखमी झाला, तर बघुना पांडूरंग तुलावी (२८) व देवराव बाजीराव उसेंडी (३०, रा.भगवानपूर ता.कुरखेडा) या दोघांना चारही बाजूने घेरून ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या गावडेला आरमोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुलावी व उसेंडी यांना पोलिसांनी ताब्यात ठेवले आहे.
प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.राहुल खाडे करत आहेत. काहींच्या मते आनंद गावडे व त्याचे अकरा सहकारी कराडीच्या जंगलात रानडुकराची शिकार करण्यासाठी जात होते. रस्त्यात त्यांना सी-६० पोलिसांनी घेराव करून गोळीबार केला. यात गावडे याचा मृत्यू झाला, तर पोलिसांच्या मते गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोळीबार केल्याने त्याचे प्रत्युत्तर म्हणून पथकाने गोळीबार केला. यातील एक गोळी गावडे याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला.  अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनीही अटकेत असलेले दोन आरोपी व मृत नक्षलवादी की शिकारी, हे आताच सांगणे कठीण असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Story img Loader