हॉकी स्टेडियमजवळील रिंगरोडवरील जलवाहिनीस शुक्रवारी मोठी गळती लागल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. सुमारे दहा फूट खोलवर खड्डा खोदल्यानंतर गळती कोठे आहे, हे निदर्शनास आले असून गळती रोखण्याचे काम प्रशासनाने गतीने सुरू केले आहे. तर या प्रकारास ‘आयआरबी’ कंपनीचा ढिसाळ कारभार व हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोप करीत या ठिकाणी टोलविरोधी कृती समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. दोन आठवडय़ापूर्वी मुख्य जलवाहिनीस गळती लागल्याने पाणीपुरवठा विभागासमोर आव्हान निर्माण झाले होते. गळती काढण्याचे काम क्लिस्ट स्वरूपाचे असल्याने शहराला तब्बल चार दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. टँकरद्वारा शहरवासियांची तहान भागविण्याची वेळ प्रशासनावर आली होती. हा कटू अनुभव ताजाअसतांना शुक्रवारी पुन्हा एकदा गळतीच्या प्रकाराची पुनरावृत्ती घडली.
हॉकी स्टेडियमजवळून जाणारा रिंगरोड आयआरबी कंपनीने बनविलेला आहे. शहरातील रस्ते बनवितांना आयआरबी कंपनीने युटिलिटी शिफ्टिंगचे काम करण्यास दुर्लक्ष केले होते. जलवाहिन्या असलेल्या भूभागावरच आयआरबी कंपनीने रस्ते बनविले आहेत. या प्रकाराविरूध्द टोलविरोधी कृती समितीने सातत्याने आवाज उठविला होता. युटिलिटी शिफ्टींगसाठी कृती समितीच्यावतीने अनेक आंदोलनेही केली होती. मात्र महापालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नव्हती.
शुक्रवारी रिंगरोडला गळती लागल्याने तेथे पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावरून वाहत होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी तेथे जमा झाले.समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार, नगरसेविका आशा बराले, महेश बराले आदी तेथे जमले. यांनीही या प्रकाराविरूध्द संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आयआरबी कंपनीविरूध्द घोषणा देण्यात आल्या. घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी एच.के.माने आले होते. आयआरबी कंपनीने युटिलिटी शिफ्टींगचे काम योग्यरीत्या पार न पाडल्यामुळे ही दुर्दशा उद्भवली असल्याची संतप्त प्रतिक्रिया टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी केली. या लोकभावना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यासमोर मांडण्यात येतील, असे त्यांनी कबूल केले. दरम्यान, गळती शोधण्याचे काम हे प्रशासनासमोर आव्हान बनले होते. गळतीच्या ठिकाणी दहा फूट खोलवर खड्डा खोदण्यात आला. तेथून जाणाऱ्या सोळा इंची जलवाहिनीस गळती झाल्याचे दिसून आले. गळती रोखण्यासाठी जलअभियंता मनिष पवार व त्यांच्या पथकाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू होते.
जलवाहिनीच्या गळतीने कोल्हापुरात धावपळ
हॉकी स्टेडियमजवळील रिंगरोडवरील जलवाहिनीस शुक्रवारी मोठी गळती लागल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. सुमारे दहा फूट खोलवर खड्डा खोदल्यानंतर गळती कोठे आहे, हे निदर्शनास आले असून गळती रोखण्याचे काम प्रशासनाने गतीने सुरू केले आहे. तर या प्रकारास ‘आयआरबी’ कंपनीचा ढिसाळ कारभार व हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा आरोप करीत या ठिकाणी टोलविरोधी कृती समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.
First published on: 01-03-2013 at 08:58 IST
TOPICSगळती
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hurry bustle in kolhapur due to leakage in water pipeline