रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, ट्रॅक्टर भाडे, सुधारित बी-बियाणे इत्यादींच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकरी हतबल झाला आहे, मात्र मळणीच्या दिवसात पाऊस पडणार नाही व चांगले उत्पादन मिळेल, या आशेने शेतकरी आता उन्हाळी धानपिकांच्या लागवडीत गुंतला आहे.
शेती करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानपिकाला भाव मिळेल, धानपीक रोगाला बळी पडणार नाही, कापणी-मळणीच्या दिवसात अवकाळी पाऊस येणार नाही, अशी आशा शेतकरी बांधवांनी बाळगली आहे. इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने उन्हाळी धानपिकासाठी पाणी सोडल्याने महिन्याअगोदरच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानाची पेरणी केली होती. उत्तम मशागत, रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशकांची फवारणी केल्याने धानपीक जोमाने वाढले. लावणीयोग्य पऱ्हे झाल्याने परिसरातील शेतकरी नांगरणी, चिखलणीच्या कामात व्यस्त आहेत. शेतात ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने शेतशिवारात कित्येक शेतकऱ्यांनी भात लावणीचे काम उरकले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे बलजोडी आहे ते परंपरागत लाकडी नांगर व फण इत्यादींचा वापर नांगरणी व चिखलणीसाठी करताना दिसतात. लाकडी नांगर व फण इत्यादींद्वारे शेतीची उत्तम मशागत होऊन शेतीच्या बांधात समतोल पाणी साठविणे शक्य होत असल्याने ट्रॅक्टरच्या काळात बलजोडीचा वापर शेती करण्यासाठी होत आहे. सध्या शेतशिवाराचा फेरफटका मारल्यानंतर हिरवीगार धानरोपे दिसतात.
पेरणी करणारे पुरुष, रोवणीत व्यस्त असणाऱ्या महिला, चिखलणी करण्याऱ्या बलजोडय़ा, ट्रॅक्टरचा वापर, चिखलावर रासायनिक खते टाकणारे मजूर, असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह सिंचन व्यवस्थापन शाखा वडेगाव (रेल्वे) अंतर्गत चारपाणी वापर संस्थेमार्फत सुमारे एक हजार हेक्टर लाभक्षेत्रात इटखेडा, इसापूर, वडेगाव, घोटी-पळसगाव, सोनी, सावंगी, पुथार, कन्हाळगाव, खामखुरा इत्यादी गावातील शेतकरी उन्हाळी धानपीक घेत आहेत. सिंचन व्यवस्थापन शाखेचे शाखा अभियंता जीवनकर, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. थोडय़ात दिवसात भात लावणीचे काम पूर्णत्वास येणार असून शेत हिरवेगार दिसणार आहेत. त्यामुळे शेतकरी आशेने शेतकामात व्यस्त असल्याचे दिसून येते.

Story img Loader