जिल्हा क्रिडा संकुलासाठी वर्षभरात उपलब्ध झालेला सुमारे अडिच कोटी रुपयांचा निधी खेळाडू व क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच ‘मार्चएंड’च्या काळात घाईगडबडीत खर्च करण्याचे प्रयत्न आहेत. उपलब्ध झालेला निधी प्राधान्यक्रम ठरवून खर्च करण्याची मागणी क्रीडा संघटनांकडून होत आहे.
संकुल समितीची गेल्या सोमवारी सभा झाली. सभेत सुमारे पावणे १ कोटी ७७ लाख रुपये खर्चाचे विषय ठेवण्यात आली होती, काही जुनी देयके अदा करण्याचा व काही नवीन कामांची अंदाजपत्रके होती. सभेत जलतरण तलावाच्या कामाची गुरुवारी पाहणी केल्यानंतर देयके अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अद्यापि ही पाहणी झालीच नाही. शिवाय संकुलातील कामांची क्रिडा क्षेत्रातील तज्ज्ञांकडुनही पाहणी झालेली नाही. जलतरण तलावाच्या कामातील गोंधळ पाहता अशी तपासणी क्रीडा तज्ज्ञांकडुन आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर व वारंवार मागणी झाल्यानंतर संकुल समितीवर क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सदस्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. परंतु या सदस्यांनाही संकुलातील कामांची माहिती दिली गेलेली नाही, शिवाय नवीन जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचीही ही पहिलीच सभा होती, असे असतानाच मोठय़ा रकमांच्या देयकांचा विषय असे असतानाच मोठय़ा रकमांचा विषय सभांपुढे आणला गेला होता.
समितीचे सदस्य व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी प्रा. रंगनाथ डागवाले व अनंत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी दिड कोटी तर यंदा १ कोटी रुपयांचा निधी मिळाला, जिल्हाधिकारी टंचाई कामात व्यस्त असल्याने क्रिडा कार्यालयानेच पुढाकार घेऊन क्रीडा संघटनांची बैठक बोलवावी व प्राधान्यक्रम ठरवावा, संघटनांच्या प्रतिनिधीनीही संकुलातील कामांची माहिती घेऊन आवश्यक सुचना आपल्याकडे केल्यास समितीच्या सभेत त्यावर चर्चा घडवुन आणली जाईल, असे अवाहन देसाई यांनी केले.
नुकत्याच झालेल्या समितीपुढे इनडोअर हॉल छताच्या दुरुस्तीसाठी १६ लाख २२ हजार रु., लॉन टेनिससाठी ३९ लाख ५१ हजार रु.चे सिंथेटिक कोर्ट उभारणे, बास्के टबॉलच्या मैदानासाठी १८ लाख ६२ हजार रु., होस्टेल व हॉलच्या खिडक्यांना फायबर ग्लास बसवण्यासाठी १ लाख ४४ हजार रु., स्टेडिअममधील प्रसाधनगृहांची दुरुस्तीसाठी २ लाख रु., चेंजिग रुमसाठी १० लाख ८१ हजार रु. अशी काही अंदाजपत्रके सादर करण्यात आली तर जलतरण तलावाच्या कामाचे ५८ लाख ५३ हजार रु., फिल्ट्रेशन प्लँटचे ८ लाख ७५ हजार रु., राज्य स्पर्धा झालेल्या अॅथलेटिक मैदानाचे २ लाख ८२ हजार रु., पॉप अप सिस्टिमच्या दुरुस्तीचे १ लाख २९ हजार रु., वसतीगृह व तालिम बांधकामाचे ६ लाख ९९ हजार रु. अशी काही जुनी बिले अदा करण्याचा विषय होता. त्यातील सिंथेटिक कोर्टचा विषय जिल्हाधिकाऱ्यांनीच नाकारला.
पॉप अप सिस्टिम कधी उभारली गेली व तीचा वापर कधी झाला हेच जर समजले नसेल तर अशी बिले कशी द्यायची असा प्रश्न डागवाले यांनी उपस्थित केला. हॉलच्या छताची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती पाहता, पुर्वी झालेल्या कामाचा दर्जा, त्याची मुदत, काम कोणी केले होते, त्याच्याकडुन मिळालेली हमीची मुदत याची तपासणी होऊनच नवीन काम सुरु केले जावे, अशी खेळाडुंची अपेक्षा आहे. संकुल समितीवर तीन आमदार सदस्य आहेत, परंतु अधिवेशन काळातच संकुल समितीच्या सभा आयोजित केल्या जात असल्याने त्यांना सभेस उपस्थित राहता येत नाही, मागील आठवडय़ात झालेल्या सभेची पुर्वसुचना, नोटिस आ. डॉ. सुधीर तांबे यांना दिली गेलीच नव्हती, याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.

Story img Loader