घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीस विहिरीत ढकलून देऊन व नंतर खाली उतरून पाण्यात लोटून देऊन जीवे मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे घडली.
यमुनाबाई दिगंबर आडकिने (वय ३२) असे या महिलेचे नाव आहे. तिचा पती दिगंबर जगनराव आडकिने याने तिला विहिरीत ढकलून जीवे मारले. दत्तराव माधवराव कल्याणकर (महादेव पिंपळगाव, जिल्हा नांदेड) यांनी आखाडा बाळापूर पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डोंगरकडा येथील यमुनाबाई व तिचा पती दिगंबर आडकिने या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता वाडय़ातच विहिरीवर पाणी भरण्यास यमुनाबाई गेली. ही संधी साधून पती दिगंबरने तिला विहिरीत ढकलून दिले. विहिरीत ढकलून दिले जाताच यमुनाबाईला वाचविण्यासाठी ज्ञानेश्वर व पंजाब आडकिने हे दोघे धावले. मात्र, दिगंबरने विहिरीत उतरत असताना त्यांना अडविले व स्वत: विहिरीत उडी मारून यमुनाला पाण्यात बुडवून जीवे मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विहिरीत पडल्यानंतर यमुनाबाईने विहिरीत असलेल्या मोटारीच्या पाइपला पकडले व मदतीसाठी ती ओरडू लागली. त्याच वेळी आत उतरलेल्या दिगंबरने तिच्या खांद्याला लाथा मारून तिला पाण्यात लोटून दिले. सुमारे २५-३० फूट खोल पाण्यात बुडाल्याने यमुनाबाईचा करुण मृत्यू झाला. दिगंबर आडकिनेविरुद्ध आखाडा बाळापूर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक विकास तोटावार तपास करीत आहेत.
येळीत महिलेचा मृतदेह
औंढा नागनाथ तालुक्यातील येळी शिवारात मानेजी धारोजी आळणे याच्या शेतातील विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह गुरुवारी आढळून आला. शुक्रवारी हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, जमादार इंगोले तपास करीत आहेत.     

Story img Loader