पत्नीला सासरी नांदविण्यासाठी गावाकडे घेऊन जाण्यासाठी आलेल्या मुकद्दर शमशोद्दीन काझी (वय ३१) यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. शहरातील नई जिंदगी चौकातील आनंदनगर तसेच लष्कर भागात अशा दोन ठिकाणी त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी त्याची पत्नी नाझिया व मेहुण्यासह चौघाजणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत मुकद्दर हा उस्मानाबाद शहरातील काझी गल्लीत राहणारा होता. त्याची पत्नी नाझिया ही पतीबरोबर भांडण करून सासरी न नांदता सोलापुरातील माहेरी येऊन राहात होती. नई जिंदगी चौक परिसरातील आनंदनगर भाग-१ येथे माहेरी राहणाऱ्या नाझिया हिला सासरी पुन्हा नांदविण्यासाठी मुकद्दर हा आला असता पत्नी नाझिया व मेहुणा अब्बास नझीर शेख व इतरांनी त्यास मारहाण केली. तेव्हा स्वत:ची जीव वाचविण्यासाठी मुकद्दर हा लष्कर भागात कुंभार गल्लीत आपला आत्येभाऊ खुर्शीद सातखेड याच्याकडे आला असता तेथेही त्याची पत्नी नाझिया व मेहुणा अब्बास याच्यासह इतर दोन महिलांनी पाठलाग करीत आल्या व त्यांनी पुन्हा त्यास बेदम मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्यास भाचा सज्जाद शेख याने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. याप्रकरणी खुर्शीद सातखेड याने दिलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.