आधी पटत नसल्याने विस्कटलेला संसार दोघांनी तडजोडीनंतर पुन्हा सुरू केला. परंतु पुन्हा काही निमित्त मिळाले आणि निर्दयी पतीने पत्नीला मोटरसायकलवर बसवून वेगात असताना खाली ठकलून दिले. या प्रकरणी पतीविरुद्ध हिंगोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील नवलगव्हाण येथील कावेरीबाई रतन कोरडे हिला पतीने दुचाकीवरून खाली पाडून जीवे मारले. कावेरीबाईचे वडील सखाराम सीताराम मुटकुळे यांच्या तक्रारीवरून पती रतन कोरडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. यापूर्वी सन २००३ मध्ये आरोपीविरुद्ध ४९८चा गुन्हा दाखल झाला होता. रतन कोरडे व त्याची पत्नी कावेरीबाई हे दोघे सुलदलीला गुरुवारी दुपारी ३ वाजता मोटरसायलवरून जात असताना सावा शिवारात आरोपी कोरडे याने जाणीवपूर्वक दुचाकीला कट मारून कावेरीबाईला खाली पाडले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र, कोरडे याने दुचाकीचा अपघात झाल्याचे दाखवून कावेराबाईला घरी नेले व तिच्या नातेवाइकांना याची माहिती देत मृत्यू झाल्याचे कळविले.
कावेरीचे वडील सखाराम सीताराम मुटकुळे (सुलदली, तालुका सेनगाव) यांनी या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांची भेट घेत आरोपीकडून कावेरीबाईचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली.
यापूर्वीही २००३ मध्ये तिचा छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला असल्याचे निदर्शनास आणले. त्यावेळी कलम ४९८ कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. दोघांचे पटत नसल्याने सोडचिठ्ठीपर्यंत मजल गेली होती. परंतु लोकांच्या मध्यस्थीने पुन्हा संसार जुळविण्यात आला, अशी पुराव्यानिशीची माहिती तिच्या वडिलांनी दिली. या घटनेचा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी कोरडेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा