दुष्काळग्रस्त भागातील गाळउपसा करण्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर पतंजली योगपीठाकडून काही मदत मिळू शकेल काय, असा प्रश्न योगगुरू बाबा रामदेव यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, ‘मैं तो फकीर हूं, फिर भी सोचेंगे’.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल रामदेवबाबा यांनी खेद व्यक्त केला. या बरोबरच होळी सणानिमित्त आसारामबापू यांनी पाण्याचा प्रचंड अपव्यय केल्याच्या कारणावरून प्रसारमाध्यमांनी, विशेषत: वृत्तवाहिन्यांनी मोठी टीका केली होती. या पाश्र्वभूमीवर रामदेवबाबा यांनी मात्र आसारामबापू यांची अप्रत्यक्ष पाठराखणच केली. या अनुषंगाने माध्यमांनी रंगविलेले चित्र चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
घाणेवाडी जलसंधारण मंचातर्फे घाणेवाडी तलावातील गाळउपसा करण्याच्या कामाची पाहणी बाबा रामदेव यांनी केली. या वेळी बोलताना होळीच्या कार्यक्रमात आसारामबापूंनी केलेल्या पाण्याच्या नासाडीचेही त्यांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले. जालना शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या दोन स्रोतांपैकी एक घाणेवाडी तलाव आहे. सुमारे ८० वर्षांपूर्वी निजाम राजवटीत तयार केलेल्या या तलावातील गाळ उपसण्याचे काम जलसंरक्षण मंचच्या पुढाकाराने गेली काही वर्षे करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता शेगावहून औरंगाबादकडे जाताना बाबा रामदेव यांनी या तलावास भेट दिली. जेमतेम १० मिनिटे बाबा तेथे होते. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीविषयी चिंता व्यक्त करून पडणाऱ्या पावसाचे महत्त्व प्रत्येकाने ओळखून त्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी या वेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, पूर्वीच्या काळात आपल्या देशातील खेडय़ांमध्ये पाण्याचे महत्त्व ओळखून त्याच्या साठवणुकीची व्यवस्था तलाव आणि अन्य माध्यमांतून करण्यात येत होती. पतंजली योग समितीच्या वतीने महाराष्ट्रातील दुष्काळी भागात मदत करण्यात येत आहे. जालना परिसरातील मोरांचा पाण्याअभावी मृत्यू होत असून ते खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी रामदेवबाबा यांनी ग्रामस्थांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली.
नको ती वक्तव्ये दुर्भाग्यपूर्ण
घाणेवाडी तलावास भेट दिल्यानंतर रामदेवबाबांनी बदनापूर तालुक्यातील उज्जनपुरी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. तेथे पतंजली योग समितीच्या वतीने ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या टँकरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेस भटकंती करावी लागत आहे. आपल्या देशातील नेत्यांना काय झाले आहे? असा सवाल करून ते म्हणाले की, कोणी देशास मधमाश्यांचे पोळे म्हणतो, तर कोणी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्यांसाठी नको ती वक्तव्ये करतो. हे सर्व दुर्भाग्यपूर्ण आहे.

Story img Loader