गेल्या २५ वर्षांपासून मी राष्ट्रीय राजकारणात आहे. पुढील २० वर्षे तरी देशात संयुक्त सरकार राहणार आहे. कोणत्याही पक्षाचा पक्षनिरीक्षक जागावाटपाचे काम करीत नसतो. राज्यात व देशात काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. हिंगोलीच्या जागेबाबत सोनिया गांधी व शरद पवार निर्णय घेतीलच. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मीच निवडणूक लढविणार असल्याचा दावा माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केला.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आमदार राजीव सातव यांची शिफारस केली. तसेच अ‍ॅड. शिवाजीराव जाधव हेसुद्धा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून निवडणूक, मोर्चेबांधणीला लागल्याने जिल्हय़ात निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले. सर्वत्र या मतदारसंघातील उमेदवार कोण, हा चर्चेचा विषय बनला आहे.
 पाटील हिंगोलीत शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या. त्यांनी सांगितले, की माझ्या मंत्रिमंडळातील कार्यकाळात या मतदारसंघात साडेआठशे कोटींचा निधी विकासकामासाठी मी आणला. मात्र, आता मी या मतदारसंघात पराभूत झाले असताना या मतदारसंघात मंजूर झालेल्या निधीपैकी उर्वरित १०० कोटी आणण्याकरिता कोणी प्रयत्न केले नाहीत. या जिल्हय़ातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातून राष्ट्रवादीतर्फे विनिता माने, सुप्रिया सुळे व मी अशा तीनच महिला आहोत. पक्ष आमच्या तिघांचा विचार करूनच निर्णय घेतील.