‘मागणी तसा पुरवठा’ हा नियम पाळतानाही ज्या संगीतकारांनी दर्जेदार संगीत दिलं त्यांच्यात कल्याणजी-आनंदजी या जोडीचा समावेश होतो. यामुळेच ‘सरस्वतीचंद्र’, ‘हिमालय की गोद में’, ‘सफर’ यांसारख्या चित्रपटांसाठी आशयगर्भ गाणी देणाऱ्या या जोडीने ‘कुर्बानी’, ‘जान्बाज’, ‘डॉन’सारख्या चित्रपटांत बदलत्या प्रवाहाला साजेशी गाणीही सहज दिली. या जोडीतील धाकटी पाती म्हणजे आनंदजी यांनी कालच म्हणजे २ मार्चला ८० वा वाढदिवस साजरा केला, त्यानिमित्त त्यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला दिलेली विशेष मुलाखत.
वडिलांचा आदेश
आमच्यावर आमच्या वडिलांचा खूप प्रभाव आहे. या मोहमयी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार वाहवत गेले. मात्र आम्हाला वडिलांनी आधीच सांगितलं होतं, ‘काम नशिबाने मिळतं, हे लक्षात ठेवा, काम मिळवण्यासाठी दारू पिण्याची किंवा पाजण्याची गरज नाही. कबीर, मीरा आदी संतांनी एवढं मोठं काम करून ठेवलं आहे, त्यांना कोणतं व्यसन होतं का?’ या बाळकडूमुळे आमचे पाय जमिनीवर राहिले. ‘तुम्ही समाजाचं देणं लागता, त्यासाठी चॅरिटी शो सुरू करा’, हा सल्लाही वडिलांचाच. त्यामुळे १९५४ मध्ये आम्ही पहिला ऑर्केस्ट्रा सुरू केला. त्यानंतर देश-विदेशांत आम्ही अनेक वर्षे चॅरिटी शो केले.
तुमच्या यशाचं रहस्य काय, असं अनेक जण मला आजही विचारतात. त्यांना मी एकच उत्तर देतो, ते म्हणजे, रसिकांचं प्रेम, वडिलांचे आशीर्वाद आणि ईश्वरीकृपा यामुळे आम्ही नावारूपाला आलो, अर्थात परिश्रमही तितकेच घेतले. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, यशस्वी संगीतकार म्हणून आमची ख्याती झाली, याचा आनंद आहेच, मात्र आम्ही नेहमी कामाचा आनंद घेत गेलो, यशापयश हा केवळ नशिबाचा भाग आहे, असंच आम्ही मानत आलो.
आता काही वेळा आश्चर्यही वाटतं की, त्या वेळी असणाऱ्या दिग्गज संगीतकारांमधून आपण आपलं स्थान कसं निर्माण केलं. मात्र तो काळ वेगळा होता. तेव्हाचं संगीत आणि संगीतकार वेगळे होते. कोण नव्हतं तेव्हा? शंकर-जयकिशन, सलील चौधरी, मदनमोहन, ओ. पी. नय्यर, रोशन, सी. रामचंद्र, नौशाद, सचिनदेव बर्मन, जयदेव, रवी, वसंत देसाई.. यादी न संपणारी आहे. परंतु या सर्वाची स्वतंत्र शैली होती, सर्व जण आपापल्या कामाचा आनंद घेत असत, गायक-गायिका चांगले होते, गीतकार दर्जेदार होते. अशा स्थितीत आमच्यापुढील आव्हान खूप मोठं होतं, स्पर्धा होती, तरीही टिकलो, यशस्वी झालो, याचं कारण म्हणजे आम्ही स्पर्धेला कधीच घाबरलो नाही. शिवाय अनेक वाद्यांवर आमचं प्रभुत्व होतं. तेव्हा गिरगावमध्ये राहत असल्याने मराठी आणि गुजराती लोकसंगीत माहीत होतंच. शिवाय पंजाबी, बंगाली, गोवा, उत्तर प्रदेश येथील लोकसंगीत कसं आहे, त्यात विशेष करून कोणती वाद्यं वाजवली जातात, वाद्यमेळ कसा असतो, याचाही आम्ही बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे चित्रपट मिळत गेल्यानंतर याचा फायदाच झाला. लोकांना काय आवडतं, याचीही जाण होतीच, आमची गाणी लोकप्रिय होण्याचं ते रहस्य आहे.
नवनवीन प्रयोग करणं तर आमच्या आवडीचा विषय होता, म्हणूनच कल्याणजीभाईंनी ‘नागीन’मधील गाण्यात बीन म्हणून वाजविलेलं क्लेव्हायलीन हे तेव्हा नवीन असलेलं वाद्य कमालीचं लोकप्रिय झालं. आजही ती धून कोणी विसरलेलं नाही. ‘नागीन’नंतर संगीतकार या नात्याने स्वतंत्रपणे काम मिळण्याचं प्रमाण वाढलं. गाणी संगीतबद्ध करताना आवश्यकतेनुसार लोकसंगीताचा आवर्जून उपयोग केला. याचा परिणाम म्हणजे अनेक गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. लोकसंगीताच्या या यशस्वी प्रयोगाची अनेक उदाहरणे आहेत. ‘हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है’ (चित्रपट- कसौटी, नेपाळी लोकगीत), यारी है इमान मेरा (चित्रपट- जंजीर, अफगाणिस्थानी संगीत), मैं तो भूल चली (चित्रपट- सरस्वतीचंद्र, गरबा), गोविंदा आला रे आला (चित्रपट- ब्लफ मास्टर, मराठी लोकगीत), खाईके पान बनारसवाला (चित्रपट- डॉन, उत्तर प्रदेश लोकगीत) ही गाणी काळाच्या कसोटीवर उतरली आहेत.
आम्ही आमची स्वतंत्र शैली निर्माण केली तरीही आमच्या संगीतरचनांवर शंकर-जयकिशन यांची छाप होती, असं आजही म्हटलं जातं, मात्र मला त्यात तथ्य वाटत नाही. माझ्या मते ‘छलिया’मधील गाण्यांमुळे सर्वाना असं वाटलं असावं. त्या चित्रपटात राज कपूर प्रमुख भूमिकेत होता. त्यामुळे ‘छलिया मेरा नाम’ सारखं गाणं दिलं इतकंच, ती शैली शंकर-जयकिशन यांच्यासारखी असू शकेल, मात्र त्यातील बाकीची गाणी किंवा आमच्या इतर गाण्यांना कान दिला तर आमचं वेगळेपण लक्षात येईल. अर्थात शंकर-जयकिशन आमचे आवडते संगीतकार होतेच. मात्र प्रभावाचं बोलायचं झालं तर त्यांच्यापेक्षा आम्हाला सचिनदेव बर्मन यांच्या गाण्यातील साधेपणा अधिक आवडायचा.
आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हाच्या कलाकारांमध्ये निकोप स्पर्धा होती. नंतरच्या पिढीतील राहुलदेव बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याशी तर आमची खास मैत्री होती. जवळपास दोन दशके आम्ही तिघांनी सर्व चित्रपट वाटून घेतले होते, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आमचा भर लोकसंगीत व शास्त्रीय संगीतावर तर लक्ष्मी-प्यारेचा कल पंजाबी गाण्यांकडे अधिक, तिकडे पंचमचा आधुनिक पद्धतीचं संगीत देण्यात हातखंडा होता.
आम्ही तिघेही नियमित भेटत असू, गाणी-गप्पांची बहार उडत असे. दुसरीकडे गायक-गायिकांच्या बाबतीतही हेच होतं. किशोर, रफी, मुकेश, लता, आशा आदी सर्वच गायकांना आम्ही चांगली गाणी दिली. मुकेशना उडत्या चालींची गाणी सहसा कोणी देत नसे, आम्ही मात्र ‘डम डम डिगा डिगा’ त्यांच्याकडून गाऊन घेतलं, तर उछलकूद करणाऱ्या किशोरला ‘जिंदगी का सफर’ आणि ‘मेरा जीवन कोरा कागज’सारखी गंभीर गाणी दिली. ही गाणी किशोरची खास आवडीची होती, हे विशेष.
संगीताच्या बदलत्या प्रवाहांशी आम्ही वेळोवेळी जुळवून घेतलं. काळानुरूप संगीत दिलं. तरीही ‘ओए ओए’नंतर गाण्यांचा ट्रेण्ड भलताच बदलला. त्या वेळी कल्याणजीभाई म्हणाले, ‘हा नवा बदल आपल्याला मानवणारा नाही, आपण अडीचशे-तीनशे चित्रपट केले, मनसोक्त काम केलं, आता थांबू, नवीन गायक-गायिका शोधून काढू, चॅरिटी शो करू..’ मी त्यांना होकार दिला आणि आम्ही थांबलो. गाण्यांची परिभाषा आज खूपच बदलली आहे, अशी तक्रार होताना दिसते, मात्र केवळ काळच बदललाय, आपलं आयुष्य बदललाय, तिथं संगीताचा अपवाद कसा असेल? आता चाहत्यांच्या प्रेमात आणि जुन्या आठवणीत मी रमलोय.

Story img Loader