नगर शहरातील उड्डाणपुलाची उभारणी झाली नाही, याचे शल्य आपल्याला आहे असे सांगतानाच माजी जिल्हाधिकारी व आदिवासी कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नगर जिल्ह्य़ातील विकासप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भविष्यातही आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
डॉ. संजीवकुमार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा पत्नी डॉ. सुप्रिया यांच्यासह, स्नेहालय, माउली सेवा प्रतिष्ठान (शिंगवे नाईक), विद्यार्थी सहाय समिती (श्रीगोंदे) व शहरातील डॉक्टर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, डॉ. एस. एस. दीपक, सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते डॉ. संजीवकुमार यांना नागरी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
नगरमध्ये काम करताना यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले, दहा लाख लोकांचे विस्थापन व जनावरांचे प्राण जाण्याची भीती होती, मात्र राजकीय व सामाजिक समंजस नेतृत्वाच्या मदतीने परिस्थिती हाताळता आली. येथील सामाजिक चळवली व परंपरांनी आपल्याला अनुभव समृद्ध केले. लोकांमधून उभ्या राहिलेल्या चळवळी व आंदोलने हे जिल्ह्य़ाचे वेगळेपण आहे. त्यातून लोकशाहीची प्रक्रिया अधिक प्रगल्भ होते आहे, परंतु त्यामुळेच प्रशासकीय चौकटीबाहेर जाऊन विकासाच्या प्रक्रियांशी संवाद साधण्याची आवश्यकता व उपयुक्तता लक्षात येते असे संजीवकुमार म्हणाले.
या वेळी स्नेहदीप रुग्णसेवा केंद्रास मदत करणारे डॉ. रवि सोमाणी, डॉ. सुभाष तुंवर, डॉ. नम्रता काबरा, संतोष चन्नोकर, दत्तात्रेय दलाल, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. सुप्रिया गाडेकर, डॉ. कमलेश बोकील आदींचा गौरव करण्यात आला. संयोजक डॉ. सुहास घुले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्वाती घुले यांनी सूत्रसंचलन केले. पुण्यातील डॉक्टरांचा ‘लेटस् अॅक्ट’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा