‘नाटकापेक्षा चित्रपटात काम करणे सोपे असते कारण तिथे काही चुकले तर पुन्हा अपेक्षित चित्रिकरण करता येते. रंगमंचावर मात्र त्याक्षणी आपल्या अभिनयातून तुम्हाला प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. त्यांचे मन जिंकावे लागते. हे एकप्रकारचे आव्हान आहे आणि ते मला पेलता येणार नाही त्यामुळे भविष्यातही मी नाटकात काम करेन असे वाटत नाही’, असे सांगत लाखो प्रेक्षकांच्या दिल की धडकन असणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपण रूपेरी पडद्याशीच एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. उमेश आजगावकर यांची निर्मिती असलेल्या लक्कीली नशीबवान या नाटकाची घोषणा नुकतीच माधुरीच्या उपस्थितीत माटुंग्यातील यशवंत नाटय़मंदिरात करण्यात आली त्यावेळी माधुरीने मनमोकळ्या गप्पा मारताना नाटय़क्षेत्राविषयीची आपली भावना व्यक्त केली. ‘लहानपणी शाळेतून मी अनेक नाटकांमध्ये काम केले. नृत्याचा कलाविष्कारही तिथेच घडला त्यामुळेच खरेतर मी चित्रपटात येऊ शकले’, असे सांगणाऱ्या माधुरीने मराठी चित्रपटात काम करणार का?, या लोकांच्या मनातील प्रश्नाचेही उत्तर देऊन टाकले. मराठी चित्रपटात काम करण्याविषयी अनेकांनी विचारणा केली आहे मात्र अजून तो योग आलेला नाही, असे तिने स्पष्ट केले. या कार्यक्रमाला माधुरी दीक्षित, तिचे पती डॉ. श्रीराम नेने, राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील, अभिनेते विनय आपटे, नाटकाचे लेखक-दिग्दर्शक केदार परूळेकर आणि निर्माते डॉ. उमेश आजगांवकर उपस्थित होते.
डॉ. उमेश आजगावकर यांचे माधुरीशी आणि तिच्या कुटुंबाशी अनेक वर्ष जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याचकारणाने माधुरी आपल्या पतीसह आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. आजगावकरांच्या ध्यास या नाटय़संस्थेचीही यावेळी घोषणा करण्यात आली. दिग्दर्शक केदार परूळेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या आयोजनाला पसंतीची दाद देणाऱ्या माधुरीने ज्या अभिनव पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करून परूळेकरांनी श्रोत्यांच्या मनावर मोहिनी घातली तशीच जादू या नाटकानेही प्रेक्षकांच्या मनावर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण नाटकाच्या वाटेला जाणार नसलो तरी लहानपणापासून आपल्या मनात नाटकांचे कुतूहल होते आणि पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांची नाटके ही आपण आवर्जून पाहिली असल्याचे माधुरीने यावेळी बोलताना सांगितले.
नाटकात काम करणे मला पेलवणारे नाही
‘नाटकापेक्षा चित्रपटात काम करणे सोपे असते कारण तिथे काही चुकले तर पुन्हा अपेक्षित चित्रिकरण करता येते. रंगमंचावर मात्र त्याक्षणी आपल्या अभिनयातून तुम्हाला प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. त्यांचे मन जिंकावे लागते.
First published on: 17-11-2012 at 12:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I cant work in playact its difficult then work in movies