‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास’
आपण राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कोणतीही टिका केली नसून आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आज कर्जत तहसील कार्यालयात बोलताना सांगितले.
तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी पाचपुते बोलत होते. यावेळी प्रांताधिकरी संदीप कोकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद फाळके, काकासाहेब तापकीर, नितीन धांडे, प्रभारी तहसीलदार जैयसिंग भैसडे आदी उपस्थित होते.
पाचपुते पुढे म्हणाले, मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अक्षेपार्ह उदगार मी काढणार नाही, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. आपण जिल्हाधिकारी व कार्यकारी आधिकारी यांची प्रत्येक तालुक्यात संयुक्त आढावा बैठक घेणार आहोत, याची सुरवात कर्जतपासुन होईल. कर्जत तालुक्याला मार्च व मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा कुकडीचे आवर्तन  देण्यात येईल, कर्जतकरांनी चिंता करू नये. जामखेडसाठी चौंडी धरणात पाणी सोडण्याची मागणी मुंबई येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली नव्हती, याचा पुनरूच्चार पाचपुते यांनी यावेळी केला.
पाचपुते यांनी टँकरच्या पाणी पुरवठयाचा आढावा घेतला. दुरगाव तलावातून थेट टँकर न भरता तलावा जवळ असणाऱ्या एखाद्या विहीरीतून टँकर भरण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेणार असून दुष्काळामुळे रोजगार हमी योजनेची जादा कामे सुरू करावीत हे सांगतानाच जी ग्रामपंचायत कामे सुरू करणार नाहीत त्या ग्रामंपचायतीची बॉडी बरखास्त करण्याचा इशारा देत व त्याचे आधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्याचे जाहीर केले. ज्या तलावात पाणी उपसा करण्याची वीज बंद करण्यात आली त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी दोन तास वीज देण्यात यावी अशी सुचना करण्यात आली. उपस्थित अनेकांनी जनावरांच्या छावण्या देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी केल्या असता पाचपुते म्हणाले, यांनी ज्या भागात कुकडीचे पाणी सोडण्यात आले तिथे लगेच छावण्या देता येणार नाहीत. मात्र जिथे गरज आहे तिथे तात्काळ छावणीची व्यवस्था होईल.     

Story img Loader