शालेय अभ्यासक्रमांपासून ते विविध स्पर्धा परीक्षांपर्यंत प्रत्येकासाठी अनेक विद्यार्थी हजारो रुपये भरून क्लासेस लावतात; पण अनेकांना इच्छा असूनही केवळ क्लास लावला नाही म्हणून स्पर्धा परीक्षांसारख्या अनेक संधींना हुकावे लागते. या सर्वावर एक सज्जड उपाय गुगल प्ले या अॅप बाजारात ‘आयप्रोफ’ या अॅपच्या रूपाने उपलब्ध झाला आहे, तोही अगदी मोफत.
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला. यामुळे संगणकावरून शिक्षण हळूहळू मोबाइलपर्यंत येऊन ठेपले आहे. अगदी शाळेतील विद्यार्थीही मोबाइलचा वापर अभ्यासासाठी करू लागला आहे; पण ही बाब फक्त ज्यांच्याकडे पैसे खर्च करण्याची क्षमता आहे त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिली होती; पण विविध क्षेत्रांतील ज्ञानगंगा सामान्यांपर्यंत मोफत पोहोचवावी यातूनच आय प्रोफ या अॅपचा जन्म झाला. आयआयटी मुंबईतून मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये व्यवस्थापन पदवीमध्येही आपली चुणूक दाखवून सुवर्ण पदक मिळवलेले संजय पुरोहित यांच्या कंपनीने हे अॅप विकसित केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर संजय यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काही काळ काम केले. तेथे त्यांना देशातील ग्रामीण भागात शिक्षणावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी शासकीय नोकरी सोडून अमेरिकेची वाट धरली. तेथे त्यांनी एटी अँड टी या वायरलेस सेवा पुरविणाऱ्या कंपनीत मोठय़ा पदावर काम केले. यानंतर तेथेच विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर ते पुन्हा मायदेशी परतले आणि त्यांनी ‘आयप्रोफ लर्निग सोल्यूशन’ नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे शैक्षणिक टॅब विकसित केले गेले. आता याच कंपनीतर्फे ‘आयप्रोफ’ हे अॅप विकसित करण्यात आले असून यामध्ये पाच लाखांहून अधिक प्रश्नांचा संच, ८५ हजारांहून अधिक शैक्षणिक व्हिडीओज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नीरज पंडित
अॅपमध्ये काय आहे?
* हे अॅप मोफत असून यामध्ये विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
* अॅपमध्ये सध्या आयआयटी जेईई, बँकेचे प्रोबेशनरी अधिकारी, सीबीएसईच्या सहावी आणि सातवी इयत्तेचा अभ्यासक्रम, इंग्रजी संभाषण आणि सामान्य ज्ञानाचे धडे उपलब्ध आहेत. या अॅपमध्ये आठवडय़ाभरात सीएसएटी, एआयपीएमटी, एनडीए, सीए, सीपीटी, ऑलिम्पियाड, गेट, रेल्वे प्रवेश परीक्षा आणि भाषा अभ्यास यांचा समावेश होणार आहे.
* यातील आभासी वर्गखोलीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्र येऊन कोणत्याही वेळी संभाषण साधता येऊ शकते.
* यातील क्विकसर्च या पर्यायामुळे वेगवेगळय़ा अभ्यासक्रमांतील व्हिडीओ, नोट्स शोधणे सोपे जाते.
* यातील सर्व अभ्यासक्रम तज्ज्ञ मंडळींकडून तयार करण्यात आला आहे.
* या अॅपमध्ये इतर विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर समूहचर्चा करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
* याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्यांला एखाद्या शिक्षकालाच प्रश्न विचारायचा असेल, तर यामध्ये ‘रेज अ डाऊट’ हा पर्याय देण्यात आला आहे.
देशात शिक्षण, आरोग्य आदी पायाभूत क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणत्याही क्षेत्रातील अभ्यासक्रम कोणत्याही वेळी, कोठेही उपलब्ध होणे शक्य होणार आहे. या अॅपमुळे डिजिटल शिक्षण क्षेत्राला नवे वळण मिळणार आहे.
संजय पुरोहित,
व्यवस्थापकीय संचालक