कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले, मात्र ढिसाळ नियोजनामुळे ते शेवटपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कर्जत-राशीन रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. शेवटी पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कर्जत तालुक्यास कुकडीचे आवर्तन सोडण्याचे मुंबई येथील बैठकीत ठरले होते. करमाळा तालुक्याला पाणी न सोडता फक्त कर्जत, श्रीगोंदे व पारनेर तालुक्याला शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाणी सुटल्यावर अधिकाऱ्यांनी प्रथम करमाळा तालुक्याला पाणी सोडले व ते बंद करून कर्जत तालुक्यातील चाऱ्यांना पाणी सोडण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे एकाच वेळी अनेक चाऱ्यांना पाणी सोडल्याने पाणी कोणालाच मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले.
काल कुकडीच्या कोळवडी येथील कार्यालयात आमदार राम शिंदे, नामदेव राऊत व इतरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, आज या संतापाचा उद्रेक झाला. अंबिजळगाव व खातगाव परिसरातील संतप्त शेतकरी सकाळी रस्त्यावर आले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. जिल्हा प्ोरिषद सदस्य प्रवीण घुले, अशोक खेडकर, नानासाहेब निकत, कैलास शेवाळे, दत्ता भांडवलकर, शब्बीर पठाण, दिलीप शेळके, बापू शेळके यांच्यासह मोठय़ा संख्येने शेतकरी व महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी आंदोलन थांबवा, अन्यथा अटक केली जाईल, असा इशारा दिल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला. त्यानंतर कुकडीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली व पाणी लगेच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला व आंदोलन मागे घेण्यात आले.

Story img Loader