परिवर्तन एक बदल आणि ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना आयोजित ‘मी उद्योजक होणारच’ याच्या ५व्या यशस्वी पर्वास ठाणे शहरात उदंड प्रतिसाद मिळाला. उपक्रमाची चार पर्व मुंबईत मोठय़ा उत्साहात पार पडली होती.  
मराठी तरुणांनी तसेच सामान्य वृत्तपत्र विक्रेत्याने नोकरीत अडकून न राहता स्वबळावर उद्योगधंदा करावा, या उद्देशासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मराठी उद्योजक पितांबरी समूहाचे संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास मराठी उद्योजक निर्माण ग्रुपचे अजित मराठे, दरेकर ग्रुपचे अरुण दरेकर, विहंग ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रताप सरनाईक, मुंबईच्या डबेवाल्यांवर पी.एचडी. करणारे पवन अग्रवाल, इंग्लिश बोलचे अनिक कर्ता, मोटिवेशन गुरु संतोष कामेरकर, महाराजा ग्रुपचे प्रवीर पारकर आदी उद्योजक मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार राजन विचारे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी उद्योजकांच्या हस्ते गेल्या चार पर्वाच्या डी.व्ही.डी. संचाचे प्रकाशन करण्यात आले. उद्योजक होण्यासाठी जिद्द, संयम आणि आत्मविश्वास या तीन गुणांचा अंगीकार करावा, ‘मी उद्योजक होणारच’ यांसारख्या प्रेरणादायी पर्वाचे आयोजन होणे ही काळाची गरज आहे. हे काम नीलेश मोरे यांच्या संकल्पनेतून व ‘परिवर्तन एक बदल’ संस्थेचे हेमंत मोरे, जीवन भोसले, संजय चौकेकर व ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना करत आहे. त्यांनी असेच कार्य सुरू ठेवून मराठी उद्योजक घडवण्यात मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन उपस्थित उद्योजकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.

Story img Loader