केंद्रात सत्तेचा जास्तीत जास्त वाटा मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ, सुनील तटकरे, गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह जयंत पाटील या वजनदार मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय बोलून दाखवला असला, तरी मंत्री जयंत पाटील मात्र, केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचेच पुन्हा स्पष्ट झाले. याबाबत कराड दौऱ्यावर आलेल्या ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना पत्रकारांनी छेडले असता, लोकसभेच्या चर्चा आतापासूनच गरजेच्या नाहीत. त्याबाबत योग्यवेळी भूमिका स्पष्ट करू असा नाराजीचा सूर त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,‘‘राज्य मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याचा कारभार आदर्शवत सुरू आहे. राज्याच्या हिताचे तीन नवे संकल्प विचाराधीन असून, ते लवकरच मंत्रिमंडळासमोर आणले जातील. लोकसभा निवडणुकांना अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे लोकसभेच्या चर्चा आत्ताच करून उपयोग नाही. सध्या महाराष्ट्रात ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आणखी चांगले काम करण्याची संधी आहे. पर्यावरण ग्रामसमृध्दी योजनेसारख्या योजना तळागाळात पोहोचवून राज्याच्या विकासाचा व पर्यावरण संरक्षणाचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावांना योजनेत पुरस्कार मिळाला आहे त्या गावांना आणखी बक्षीस म्हणून जादा रक्कम कशी देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामविकास खात्याने आणखी नवे तीन संकल्प करण्याचा विचार सुरू केला आहे. त्या योजना मंत्रिमंडळासमोर ठेवून लवकरच अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ ग्रामविकास खात्यावर हसतमुख चर्चा करणारे जयंत पाटील लोकसभेच्या प्रश्नावर मात्र नाराजीचा सूर आळवत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा