न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. औरंगाबादेत येण्यापासून मला जास्त वेळ अडविता येणार नाही, असे सांगत ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादेत सभा घेणारच, असे सांगितले.
तुमच्या भाषणांचा व राजकीय आगमनाचा शिवसेना-भाजपाला फायदा होईल काय, असे विचारले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काँग्रेसला फायदा झाला नाही का, असे उत्तर त्यांनी दिले. औरंगाबादला येण्यास काँग्रेसच अडसर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. खुलताबाद येथे हजरत बावीस ख्वाजा यांच्या दग्र्यावर प्रार्थनेसाठी ओवैसी बुधवारी आले. पोलीस आयुक्तालय परिसरात प्रवेशास पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी मज्जाव केला होता. त्यामुळे सिल्लोडमार्गे ते खुलताबादला गेले. प्रार्थनेनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे फार काळ मला थांबविता येणार नाही. औरंगाबादेत सभेला दोन व्यक्ती आल्या तरीही सभा होईल. अफजल गुरूला फाशी देण्याच्या प्रश्नावरही ते बोलते झाले. किमान त्याच्या घरी एक दूरध्वनी करण्याची गरज होती, असे ते म्हणाले. अनेक दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात फाशी झालेली नाही. बाबरी मशीद, मालेगाव बॉम्बस्फोट या घटनाही दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या बंधूने केलेले भाषण योग्य होते काय, असे विचारले असता, ते चूक की बरोबर हे आता न्यायालयच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा