इचलकरंजी येथील श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.६) ‘पत्रकारदिन व गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा होत आहे. या सोहळय़ास ‘माझे मन तुझे झाले’ फेम मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी व्याख्याता तथा ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे हे असतील, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष बसवराज कोटगी व उपाध्यक्ष हुसेन कलावंत यांनी दिली. यानिमित्ताने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली.
रोटरी क्लबच्या सभागृहात सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात शहर व परिसरातील विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ अशी ओळख असलेल्या ‘समाजवादी प्रबोधिनी’ या सामाजिक संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. उंच गगन भरारी घेत वस्त्रनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी पहिली कमíशयल पायलट एस्तेर भंडारे यांना ‘इचलकरंजी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वस्त्रनगरीतील वस्त्रोद्योग व्यवसायात महिला बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनलेल्या चंदूर येथील शुभाशीर्वाद महिला बचतगटास ‘उद्योजक गौरव’ तर शहरातील पहिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. कृष्णकुमार धूत यांना ‘धन्वंतरी गौरव’ पुरस्कार देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाटय़क्षेत्र, टीव्ही मालिका आणि चित्रपटात नेत्रदीपक कामगिरीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री स्वरदा ठिगळे यांना ‘विशेष कलागौरव’ पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.
या सोहळय़ास आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष सुमन पोवार, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कोडुलकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळय़ास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत सचिव शिवानंद रावळ, सहसचिव महावीर चिंचणे व खजिनदार बाबासाहेब राजमाने आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा