ज्वालामुखीच्या निर्मितीचे सप्रयोग दर्शन.. विषाणुंच्या प्रकारांसह त्याचे फायदे अन् तोटे.. साधा बल्बच्या तुलनेत सीएफलच्या वापरामुळे होणारी वीज बचत.. या विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या प्रयोगांचे सादरीकरण.. ओळंबीच्या प्रकारावरून धान्य ओळखण्याची कला.. अन्नधान्याच्या विविध जाती व त्यांच्या बियाण्यांची ओळख करून देणारे अनोखे प्रदर्शन.. अशा विविध उपक्रमांनी गुरूवारी विज्ञान दिवस शहर व परिसरासह विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये साजरा झाला. या निमित्त या क्षेत्रातील तज्ज्ञांच्यावतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमधील विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालय, विज्ञान क्षेत्रात कार्यरत संस्था यांच्यातर्फे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी विज्ञान परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने आयोजित जैवविविधता प्रदर्शनास शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सावरकर नगर येथील समाजपयोगी विज्ञान केंद्राच्या सभागृहात झालेल्या या प्रदर्शनास रचना व नवरचना विद्यालय, भोसला सैनिकी विद्यालय यातील विद्यार्थ्यांनी आपले वैज्ञानिक प्रयोगही सादर केले. त्याचे उद्घाटन सकाळी राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान प्रयोगासाठी निवड झालेल्या अमेय नेरकर या रचना विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष नवनीत गुजराती, उपाध्यक्ष धनंजय अहिरे, कार्यवाहक अजित टक्के, सहकार्यवाह संगीता मुठाळ आदी उपस्थित होते. वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना सजग करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्वालामुखीची निर्मिती कशी होते, याबद्दल सर्वानाच उत्सुकता असते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग करून दाखविण्यात आले. विषाणुंचे प्रकार कोणते ते प्रत्यक्ष सुक्ष्मदर्शिकेतून पाहण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली. कोणते विषाणू चांगले कोणते हानीकारक याबद्दल माहिती देतानाच शरीरावर आढळणारे विषाणू कोणते, त्याकरिता शरिराची स्वच्छता राखणे कसे आवश्यक असते याविषयी जनजागृती करण्यात आली. सध्या पाण्याबरोबर विजेचीही तीव्र टंचाई भेडसावत आहे. या स्थितीत सीएफएलचा वापर करून विजेची बचत कशी करता येईल हे समप्रमाण पटवून देणारा प्रयोगही प्रदर्शनाचा एक भाग होता. मुंबईच्या एका विद्यार्थिनीने ‘जेनेटिकली मॉडिफाईड फूड’ आरोग्यास कसे घातक असते त्याची माहिती दिली. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पनांनी भेट देणारे विद्यार्थीही आश्चर्यचकीत झाले. त्यांनी या प्रयोगांची माहिती घेऊन आपल्या मनांतील प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न केला.
या प्रदर्शनाचे वैशिष्ठय़े म्हणजे, वैज्ञानिक प्रयोगांच्या सोबतीला कृषी जैव विविधतेचे दर्शन घडविण्यात आले. या ठिकाणी तांदळाच्या १७०, नाचणीच्या २७, वरईच्या १०, मक्याच्या पाच, ज्वारीच्या पाच जाती, भाजीपाला, कंदमुळे असे सुमारे ३५० विविध जातींच्या धान्याचे व त्यांच्या बियाण्यांची ओळख करून देण्यात आली. विज्ञान दिनाचे औचित्य साधून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलमध्येही वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सुमारे १५० उपकरणे मांडण्यात आली होती.
बाल वैज्ञानिकांच्या कल्पनेचा आविष्कार
ज्वालामुखीच्या निर्मितीचे सप्रयोग दर्शन.. विषाणुंच्या प्रकारांसह त्याचे फायदे अन् तोटे.. साधा बल्बच्या तुलनेत सीएफलच्या वापरामुळे होणारी वीज बचत..
आणखी वाचा
First published on: 01-03-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idea discovery from child scientist