शहर आणि मॉल असे एक समीकरण तयार झाले असून गावात मॉल बांधण्याचा खासगी विकासक विचारदेखील करू शकत नाहीत. मात्र नवी मुंबई विमानतळ व जेएनपीटी प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी ‘आयडियल व्हिलेज’ तयार करण्याची संकल्पना सिडकोने तयार केली असून या संकल्पनेद्वारे गावात एक छोटा मॉल उभारण्याचा सिडकोचा विचार आहे. या पहिल्या संकल्पनेची सुरुवात जासई या प्रकल्पग्रस्तांच्या हुतात्मा गावातून होत आहे. व्हिलेज मॉलमध्ये एकाच इमारतीत खरेदीची विविध दालने सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे.
नवी मुंबई शहर, जेएनपीटी आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात सिडकोविषयी एक नाराजी निर्माण झाली आहे. प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करेपर्यंत सिडको प्रकल्पग्रस्तांना अनेक आश्वासनांची खैरात वाटते; मात्र प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून दिले जाते, अशी भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये रुजू लागली होती. यात बदल करून विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी जाणीवपूर्वक काही कार्यक्रमांची आखणी केली आहे. त्यामुळेच प्रस्तावित विमानतळ, नयना क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांशी सुसंवाद साधला जात असून राज्यातील अथवा परराज्यातील सहकार तत्त्वावर निर्माण झालेल्या प्रकल्पांची माहिती या शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त सिडकोच्या नवनवीन प्रयोगांना साथ देण्यास पुढे सरसावले असून सिडकोप्रती एक विश्वासपूर्ण वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. साडेबारा टक्के योजना लागू करण्यासाठी दिवगंत माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या १९८४ च्या लढय़ातील जासई या मध्यवर्ती गावात सिडकोने ‘आयडियल व्हिलेज’ व व्हिलेज मॉलची संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांच्या हस्ते या संकल्पनेची सुरुवात शुक्रवारी केली जाणार आहे.
‘आयडियल व्हिलेज’ संकल्पना
सिडकोच्या ‘आयडियल व्हिलेज’ या संकल्पनेद्वारे गावात एक छोटा मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमध्ये मासळीपासून भाजीपर्यंत अनेक दुकानांची संकुले उभारली जाणार आहेत. याशिवाय गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी एक छोटा प्रकल्प उभारला जाणार असून त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. गावाजवळ असलेल्या ‘होल्डिंग पॉण्ड’चे सुशोभीकरणदेखील केले जाणार आहे. जुन्या रुग्णालयाची डागडुजी करून ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न या आदर्श गाव योजनेत केला जाणार असून गावातील शाळेसाठी यापूर्वीच सिडकोने दोन कोटी रुपये खर्च करून तिला नवीन रूप दिले आहे. उरण तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या या गावाला एक इतिहास आहे. काही वर्षांपूर्वी सातशे ते आठशे कुटुंब वास्तव्यास असलेल्या या गावाची विद्यमान लोकसंख्या १५ हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे या गावालाही चाळ संस्कृतीच्या अतिक्रमणाने घेरले आहे. सिडकोने या गावाचे गावपण कायम राखताना नवीन सोयीसुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
जासई गावाचा विकास हा जेएनपीटी प्रकल्पांतर्गत सिडको करणार आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने एक ‘आयडियल व्हिलेज’ तयार करण्याचा सिडकोचा विचार असून त्याची सुरुवात शुक्रवारी केली जाणार आहे. खासगी स्तरावर गावांचा विकास होणे शक्य नाही. त्याऐवजी सार्वजनिकरीत्या या गावांचा विकास करण्यास सिडको पुढे सरसावली असून आदर्श गाव तयार करण्याचा सिडकोचा मानस आहे.
व्ही. राधा, सहव्यवस्थापकीयसंचालिका, सिडको