देशाचा आदर्शवादी नेता म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या मातीत अनेक रत्ने जन्माला आली. महाराष्ट्राच्या या मातीतील विलक्षण ताकदीचा अंदाज यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाहिल्यानंतर येतो. त्यांचा आदर्श नवीन पिढीपुढे चिरस्थायीपणे उभा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.
वडगाव हवेली (ता. कराड) येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळय़ाचे अनावरण व स्वर्गीय चव्हाण यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भीमरावदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, प्रा. श्रीधर साळुंखे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, माजी सदस्य जगदिश जगताप यांची उपस्थिती होती.
आनंदराव पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी समतेचे राजकरण केले. राज्याच्या विकासासाठी त्यांनी विचारवंत व्यक्तींना सत्तेत संधी दिली. महापुरूषाच्या विचारांचे जागरण वडगावमध्ये होत असल्याचा आनंद वाटतो.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी कार्यक्रमात सकाळी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यशवंत ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ज्योत वडगावमध्ये आल्यानंतर सजवलेल्या वाहनातून यशवंतराव चव्हाण यांचा अर्धपुतळा व यशवंत ज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मुख्य चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शेती उप्तन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे आदींची या वेळी उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा