चंद्रपुरात नोव्हेंबरमध्ये शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन
कापसाचे प्रचंड उत्पादन असताना आणि भूगर्भात खनिज संपत्ती असतानाही विदर्भावर अन्याय दूर करायचा असेल तर वेगळय़ा विदर्भाशिवाय पर्याय नाही, असे मत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी व्यक्त केले. अलीकडेच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त झालेल्या समारोप कार्यक्रमात विविध घोषणा करण्यात आल्या.
शेतमालाला रास्त भाव या मुख्य मागणीला धरून पुन्हा उत्तम शेती, चांदवड महिला अधिवेशन व व्यवस्था परिवर्तनाची लढाई या मुख्य बाबींना अनुसरून येत्या ८ ते १० नोव्हेंबर २०१३ ला चंद्रपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला.
समारोप कार्यक्रमात विविध घोषणा करून बैेठकीची सांगता झाली.
बैठकीला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, रवी देवांग, सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, संजय कोले, अनिल घनवट, गुणवंत हंगर्णेकर, अनिल ठाकूरवार, गंगाधर मुटे, मधुसूदन हरणे, विलास मोरे, सुरेश म्हात्रे, दिलीप भोयर, जगदीश नाना बोंडे, अॅड. दिनेश शर्मा, प्रभाकर दिवे, रसिका उलमाले उपस्थित होते.
या बैठकीत देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा सांगोपांग आढावा घेऊन आगामी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.
कापूस, धान, सोयाबीन व उस आदी शेतमालाचे भाव, सरकारचे आयात निर्यात धोरण, कर्जमुक्ती, वीजबिलमुक्ती तसेच साखर नियंत्रणमुक्त करण्याची शिफारस करणाऱ्या डॉ. रंगराजन समितीही अहवालावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपले मते मांडली.
 या बैठकीत औढा नागनाथ येथील बभ्रूवाहन तामस्कर आणि जालना जिल्हाप्रमुख गीता खांदेभराड यांचा वाढदिवसानिमित्त शरद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीला ३०० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.