शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने मूलभूत सुविधाही पुरविण्यात आलेल्या नसून बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खड्डेमय रस्ते, अस्वच्छतेमुळे रोगांच्या प्रमाणात झालेली वाढ, असे चित्र सर्वत्र दिसत असून याप्रश्नी त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.
सहवासनगरमध्ये वीज, पाण्याचे नळ, रस्ते, गटारी, पथदीप यांसारख्या मूलभूत सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. सहवासनगरसह भोईरवाडी, राहुलनगर, कस्तुरबानगर, किस्मतबाग, लक्ष्मीबाग, क्रांतीनगर, सिद्धार्थनगर, संत कबीरनगर येथील शौचालयांची दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील बऱ्याच ठिकाणी पथदीप बंद असून ते सुरू करावेत, रामायण बंगल्यासमोरील सावित्रीबाई सरकारी वसाहत परिसरात साचलेली घाण दूर करावी, त्र्यंबक रोड येथील सरकारी वसाहतीजवळ गटारी तुंबून रस्त्यावर पाणी येत असल्याने गटारी साफ कराव्यात, नासर्डी नाल्याची स्वच्छता करावी, जुने सीबीएस, मेहेर सिग्नल, राजीव गांधी भवनजवळील सिग्नल, त्र्यंबक नाका, गोल्फ क्लबजवळील सिग्नल, मायको सर्कल, पंडित कॉलनी या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, नाशिक महानगरपालिकेत नोकरभरती सुरू करावी, राहुलनगर येथील जलवाहिनीचे काम पूर्ण करावे, केटीएचएम महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाखालील गाळे बचत गटांना देण्यात यावेत, झोपडपट्टय़ांमध्ये महापालिकेने आरोग्य तपासणी मोहीम राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पत्रकाद्वारे समता परिषदेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा