जिल्ह्य़ातील द्राक्षबागा पाण्याअभावी जळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जिल्ह्य़ातील सुमारे दीडशे कोटींचे नुकसान टाळण्यासाठी रब्बीचे पहिले आवर्तन तत्काळ देण्याची सूचना मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली. पाटबंधारेमंत्र्यांनी ही सूचना मान्य केल्यामुळे नाशिक डाव्या कालव्यातून ३०० दशलक्ष घनफूट, तर आळंदी धरणातून २०० दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हे पाणी शेतीला देण्यात येईल, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. ना. म्हस्के यांनी दिली.
यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे गंगापूर धरणसमूहातील प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यात आरक्षण वगळता आता चार आवर्तन इतकेच म्हणजे ११०० दशलक्ष घनफूट पाणी यंदा उपलब्ध आहे. धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याचे कळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या धरणसमूहाच्या अंतर्गत येणारे सिंचन क्षेत्र धोक्यात आल्याची भावना वाढीस लागली. बैठकीतील निर्णयामुळे आळंदी धरण क्षेत्रातील एक हजार हेक्टर आणि नाशिक डावा कालवालगतचे २२६६ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डाव्या कालव्यावर उभ्या असलेल्या फळबागांचे आयुष्य १५ वर्षांचे असून या बागा नष्ट झाल्यास मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. पुन्हा या फळबागा उभ्या करण्यासाठी आर्थिक नुकसानीसोबत आणखी तीन वर्षे लागतील.
गंगापूर धरणसमूहातील गंगापूर, गौतमी गोदावरी व कश्यपी या धरणांमध्ये ७.०१ टीएमसी म्हणजे ७७ टक्केपाणीसाठा असून एकटय़ा गंगापूर धरणात ४.५७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरणातून काढण्यात आलेल्या उजव्या व डाव्या तट कालव्यांपैकी उजवा तट कालवा हा नागरीकरणामुळे कायमचा बंद झाला आहे, तर डाव्या तट कालव्यावर द्राक्षबागा व बारमाही पिके अवलंबून आहेत.