रासायनिक खत विक्रेत्यांना मोबाईल फर्टिलायझर मॉनिटर सिस्टिमवर (एफएमएस) नोंदणी केल्याशिवाय व्यवसाय करण्यास कृषी विभागाने प्रतिबंध केला आहे. परवानाधारक विक्रेत्यांनी मोबाईल एफएमएसवर दि. ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करुन घ्यावी, त्यानंतर नोंदणीशिवाय व्यवसाय करणाऱ्यांचे परवाने निलंबीत करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संभाजीराव गायकवाड यांनी दिला आहे. खताची आवक व जावक याची माहिती सर्वानाच होण्यासाठी कृषी विभागाने मोबाईल एफएमएस सेवा सुरु केली आहे. त्यासाठी परवानाधारक विक्रेत्यांना नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. कृषी विभाग त्यासाठी गेल्या चार-सहा महिन्यांपासून प्रयत्नशील होता. परंतु जिल्ह्य़ातील २ हजार १३२ परवानाधारक वितरकांपैकी केवळ १ हजार ४०४ खत वितरकांनीच मोबाईल एफएमएसवर नोंदणी केली आहे. नोंदणी न केलेल्या परवानाधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करुन घ्यावी अन्यथा १ डिसेंबरपासून नोंदणी न केलेल्यांचे परवाने निलंबीत केले जाणार आहेत.

Story img Loader