नितीन गडकरी व आपल्यात पक्ष चालवण्यावरून मतभेद होते, मनभेद नव्हते. त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे आपल्याला दु:ख आहे. आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची लढाई सुरू करू. महाराष्ट्र हीच आपली कर्मभूमी असल्याचे सांगून सिंचनासह अनेक घोटाळे बाहेर काढू. आघाडी सरकारविरुद्ध संघर्ष यात्रा काढणार असल्याची घोषणा खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. युतीचे सरकार आल्यानंतर संधी मिळाल्यास मुख्यमंत्री पदही स्वीकारू, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. त्यामुळे मुंडे आता विधानसभेच्या मैदानात उतरतील, असे अंदाज बांधले जात आहेत. पक्ष नेतृत्व बदल झाल्याने मुंडेंना चांगली संधी मिळणार या आशेने कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे.
राज्यात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मुंडे म्हणाले, भाजप-सेनेला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सेनेचाही चालेल आणि संधी मिळाली तर आपणही मुख्यमंत्री पद स्वीकारू अशा शब्दांत त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. मुंडे मागील १५ दिवसांपासून कनिष्ठ बंधू व्यंकटराव मुंडे यांच्या निधनामुळे परळीत मुक्कामाला आहेत. नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक झाली. मात्र, मुंडे जाऊ शकले नाहीत. पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणूक घडामोडीवर मौन बाळगून असलेल्या मुंडे यांनी गुरुवारी सायंकाळी दूरचित्रवाहिन्यांसमोर भूमिका मांडली. गडकरी व आपल्यात पक्ष कसा चालवावा यावरून मतभेद होते. मनभेद कधीच नव्हते. दोन वेळा आपले म्हणणे उघडपणे मांडले. दिल्लीत लोकसभेतील उपनेतेपद घेण्याचा निर्णय दोघांच्या संमतीनेच झाला होता. त्यामुळे आमच्यातील मतभेदाचा वाद हा माध्यमांचा होता. गडकरी यांनी कोणाच्या दबावाने नव्हे तर स्वत:हून राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे आपल्याला दु:ख आहे, पण राज्यात त्यांचा पक्षाला फायदाच होईल. नवीन अध्यक्ष राजनाथसिंह यांची सर्वानुमते निवड झाली आहे. राजनाथसिंह यांना पक्ष व प्रशासन चालवण्याचा उत्तम अनुभव असल्याने याचा पक्षाला चांगला फायदा होईल. आता राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची लढाई सुरू करणार आहोत. महाराष्ट्र हीच आपली कर्मभूमी आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारने केलेला सिंचन घोटाळा हा कलंक आहे. इतरही अनेक घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. घोटाळे झालेल्या धरणांना भेट देऊ व आघाडी सरकारविरुद्ध पुन्हा संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा त्यांनी केली. नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या पाश्र्वभूमीवर मुंडे यांनी आपली भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट केल्यामुळे आगामी काळात मुंडे विधानसभेच्या मैदानात उतरतील, असे अंदाज बांधले जात आहेत. राज्यात पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मुंडे यांना मिळणार असल्याच्या आशेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
पुन्हा मुंडे!
राज्याच्या राजकारणात भाजपमध्ये लोकनेते असलेल्या मुंडे यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत प्रमोद महाजन व मुंडे यांनी भाजपला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले. महाजन यांच्या निधनानंतर पक्षात मुंडेंची कोंडी सुरू झाली. त्यातून दोन वेळा मुंडेंनी उघड बंडाचे निशानही फडकावले. चार वर्षांपूर्वी मुंडेंना पक्षाच्या आदेशानुसार लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रीय राजकारणात जावे लागले. एक प्रकारे राज्याच्या राजकारणातून त्यांना बाजूला करण्याचाच प्रयत्न झाला होता. पण मुंडेंनी केंद्राच्या राजकारणातही आपला दबदबा कायम ठेवला.
दरम्यान, तत्कालीन अध्यक्ष गडकरी व मुंडे यांच्यातील मतभेदातून मुंडेंना संघटनेच्या प्रक्रियेतून डावलले जात असल्यामुळे मुंबईपासून गल्लीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे गडकरींच्या जागी राजनाथसिंह यांची निवड झाल्याचा मुंडेंना सर्वाधिक राजकीय फायदा होणार आहे. राजनाथसिंह हे मुंडेंचे जवळचे मित्र असून लोकसभेत एकाच बाकावर दोघे बसतात. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारण मुंडेंच्या भोवती फिरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

Story img Loader